मोहटादेवी गडावर भाविकाच्या गाडीवर नारळ आपटत, पैसे काढून घेतले

पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; व्यवसायिक एका महिलेला अटक
मोहटादेवी गडावर भाविकाच्या गाडीवर नारळ आपटत, पैसे काढून घेतले

अहमदनगर (तालुका प्रतिनिधी)

श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या चारचाकी गाडीवर स्थानिक व्यवसायिक महिलांनी नारळ व पूजेचे साहित्य आपटल्याने गाडीची काच फुटली तर दुसर्‍या महिलेने पूजा साहित्याची पिशवी गाडीत फेकली, यात पिशवितील नाराळ गाडीतील महिलेच्या डोळ्याला लागून दुखापत झाली.

त्यानंतर व्यावसायिक महिलांनी भाविकांशी हुजत घालून त्याच्या खिशातील पैसे काढून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत महिला भाविकाच्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत एका महिला आरोपीला अटक केली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सोनेवाडी (पो. मेहकरी ता. नगर) येथील सुधीर वायकर कुटुंबासह चारचाकी गाडीने (एमएच 16 सीव्ही 1877) श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर दर्शनासाठी आले होते. वायकर हे स्वतः गाडी चालवत होते तर त्यांच्या पत्नी स्वाती वायकर शेजारच्या सीटवर बसलेल्या होत्या. त्यांची मुले पाठीमागच्या सीटवर बसलेली होती. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी मोहटादेवी गडाच्या पायथ्याशी असतांना पूजेचे साहित्य विकणार्‍या महिलेने नारळ व पूजेचे साहित्य असलेली प्लास्टिकची पिशवी गाडीच्या दिशेने भिरकावली. त्या पिशवीतील नारळ गाडीच्या काचेवर जोराने आदळले. त्यामुळे गाडीची काच फुटली. त्याच वेळेस दुसर्‍या महिलेने पूजेच्या साहित्याची प्लास्टिक पिशवी गाडीत फेकली पिशवीतील नारळ स्वाती वायकर यांच्या डोळ्याला लागल्याने डोळ्याला गंभीर दुखापत झाली.

वायकर यांनी गाडी थांबून विनाकारण पिशव्या का फेकता त्यामुळे माझ्या पत्नीच्या डोळ्याला दुखापत झाली आहे, असा जाब विचारला व आम्हाला पूजा साहित्य नको आहे, परत घ्या असे महिलांना म्हणाले. त्यावर जास्त बोलू नको गुपचूप दोनशे रुपये काढून दे, असे म्हणून संबंधित व्यावसायिक महिलांनी सुधीर वायकर यांना धक्काबुक्की करून त्यांच्या खिशातील तीनशे रुपये बळजबरीने काढून घेतले. देवस्थानच्या सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून महिलांच्या तावडीतून वायकर यांना सोडवले. स्वाती वायकर यांच्या डोळ्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या घटनेबाबत स्वाती सुधीर वायकर यांच्या तक्रारीवरून सिंधूबाई रोहीदास डमाळे व बाळाबाई भानूदास शिरसाठ दोन्ही रा.मोहटादेवी गड यांच्या विरोधात भादवी कलम 392 , 337 , 427, 323 , 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत. श्रीक्षेत्र मोहटा देवी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना स्थानिक व्यावसायिकांकडून झालेली दमदाटी व मारहाण प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी डमाळे या महिला आरोपीला तात्काळ अटक केली असून दुसर्‍याही आरोपीचा शोध घेतला जात आहे. यापुढील काळात दर्शनासाठी गडावर येणार्‍या भाविकांना त्रास देणार्‍यांची गय केली जाणार नाही असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com