वाळूतस्करी करणारी 60 लाखांची वाहने जप्त

वाळूतस्करी करणारी 60 लाखांची वाहने जप्त

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

अवैधरित्या गौण खनिजाची चोरी करून वाहतूक करणार्‍यावर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करत सुमारे साठ लाखांचे वाहने जप्त केली.

पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी गावातील नानी नदी पात्रामध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे शासनाच्या मालकीची वाळू चोरी होत असल्याची महिती गुप्त बातमीदार मार्फत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर या पोलीस पथकाने रविवारी (दि.13) दुपारी  धाड टाकून नदीपात्रातून एक जेसीबी, एक ट्रॅक्टर असा एकूण वीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वाळू चोरीससह पर्यावरण संरक्षण अधिनियम या कलमान्वये पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी मासळकर यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात तिघा संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हे.कॉ.दत्तात्रय हिंगडे,संदीप पवार, संभाजी कोतकर, विनोद मासळकर यांनी केलेल्या कारवाईत बंडू शिवाजी बर्डे ,वय 36 वर्षे, रा.हनुमान टाकळी, अक्षय दत्तात्रय मरकड ,वय 20 वर्षे, रा.निवडुंगे, दिलीप शिवाजी वाढेकर,वय 32 वर्षे, रा.जोडमोहोज ता.पाथर्डी यांना आरोपी केले.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने पाथर्डी तालुक्यातील साकेगाव -चितळी रोड दरम्यान परिसरात छापा टाकून मुरूम वाहतूक करणारा एक जेसीबी,चार ट्रॅक्टर आणि दोन डंपर असा एकूण सुमारे अंदाजे चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या गौण खनिज पथकाला शुक्रवारी बेकायदा विनापरवाना मुरूम वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. एक जेसीबी, चार ट्रॅक्टर आणि दोन डंपरला सुमारे पंधरा लाख रुपयांच्या जवळपास महसूल विभागाकडून दंड केला जाण्याची शक्यता आहे.पुढील दंडाच्या कारवाईसाठी या पथकाने पाथर्डी तहसील कार्यालयाकडे कागदपत्रे दिली असून दंडाबाबत पुढील कार्यवाही तहसील विभागाकडून होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com