पाथर्डीत नवीन सात करोना बाधित
सार्वमत

पाथर्डीत नवीन सात करोना बाधित

करोना रुग्ण महिलेच्या घरापासून 200 मीटरचा परिसर सील

Arvind Arkhade

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी|Pathardi

तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील एक महिला पोलीस, तिसगावमध्ये एक डॉक्टर, शहरातील मौलाना आझाद चौकातील एक महिला व पुणे येथून आलेले चार जण असे एकूण सातजण करोनाबाधित रुग्ण शनिवारी पाथर्डीत आढळून आले. दरम्यान या रुग्णांच्या संपर्कातील व कोल्हार येथील लग्न प्रकरणातील काहींचे असे मिळून तालुक्यातील सुमारे 100 संशयित स्राव तपासणी करण्यासाठी पाठविले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली.

शहरात दिवसभर फक्त करोनाचीच चर्चा होती. सकाळीच सुरुवातीला शहरातील मौलाना आझाद चौकातील एका 45 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाल्याची माहिती समजली. त्यानंतर तालुक्यातील मूळचे आगसखांड येथील पण पुणे येथून थेट शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आलेले चार रुग्ण करोना बाधित असल्याचे डॉ. भगवान दराडे यांनी सांगितले.

तसेच तालुक्यातील तिसगाव येथील मिरी रोडवर असणार्‍या एका हॉस्पिटलच्या 33 वर्षीय डॉक्टरला देखील करोनाची बाधा झाली. त्यानंतर तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील 26 वर्षीय महिला नाशिक पोलिसाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हार येथे काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात सोनई येथील काही पाहुणे आले होते. या पाहुण्यांमधील काहींचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने या पाहुण्यांच्या संपर्कातील काही लोकांचे स्राव तपासणीसाठी घेतले आहेत.

तसेच पिंपळगाव टप्पा येथील महिला पोलिसांच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे शहरातील महिलेच्या संपर्कात आलेल्या घरातील 26 जणांचे तसेच शिक्षक कॉलनीत निघालेल्या पोलिसाच्या संपर्कातील काहीजण असे मिळून सुमारे 100 स्राव तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविल्याची माहिती डॉ. भगवान दराडे यांनी दिली. शहरातील करोनाबाधित निघालेल्या संबंधित महिलेच्या घरापासून सुमारे 200 मीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.

तसेच शिक्षक कॉलनीचा परिसर सील केलेला आहे. पिंपळगाव टप्पा गाव देखील सील करण्यात आलेले आहे. तपासणीसाठी पाठविलेले अहवाल एक-दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. हे अहवाल काय येतात याकडे सगळ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान नागरिकांनी मास्क वापरणे, शारीरिक अंतराचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com