पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शहरालगत असलेल्या कृषी विभागाच्या शेतातील सुमारे 17 एकर क्षेत्रावरील गवत जळून कृषी विभागाचे नुकसान झाले.

जोरदार वार्यामुळे वीजवाहक तारा एकमेकांवर घासून पडलेल्या ठिणग्यांमुळे आग लागली असावी, असे घटना स्थळावर उपस्थित कर्मचार्यानी सांगितले.

सोमवारी (दि. 15) सायंकाळी अचानक धूर दिसू लागल्याने कर्मचार्यांनी शेताकडे धाव घेतली. कृषी विभागाची मोठी जमीन वापराविना पडून असून तेथे मोठ्या प्रमाणावर गवत आहे. येथून वीज वाहक तारा हंडाळवाडीकडे जातात.

जोरदार वार्यामुळे स्पार्किंग होऊन आग लागली, असे समजून कृषी पर्यवेक्षक आर.टी. शिदोरे, कृषी सहाय्यक किरण सावंत, मजूर महादेव भापकर, रोपमळा मदतनीस सचिन मुने यांनी उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पालिका अग्निशामक दलाला फोन केला.

अग्निशामक दलाचे कर्मचारी राहुल दिनकर, गणेश दिनकर, अशोक बडे आदी कर्मचार्यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आग तासाभरात आटोक्यात आणली.

वार्याचा जोरदार वेग असल्याने अल्पावधीत आग पसरली. वाळलेल्या गवताने चटकन पेट घेतला. वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कृषी खात्याच्या रेकॉर्ड रूमपर्यंत आग पसरत गेली होती. फारसे नुकसान झाले नसल्याचे कर्मचार्यांनी सांगितले.