पारनेर तालुक्यात कही खुशी कही गम

आरक्षण : काही ठिकाणी पांरपरीक लढती रंगणार
पारनेर तालुक्यात कही खुशी कही गम

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या बारा जागांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात काहींचे गट आणि गण गेले तर काहींना लॉटरी लागली असून तालुक्यातील टाकळीढोकेश्वर व सुपा जिल्हा परिषद गटात पांरपरीक लढती होण्याची चिन्हे आहेत. यात जिल्हा परिषदेच्या सहा गटांपैकी ढवळपुरी अनुसूचित जमाती, कान्हुर पठार गट ओबीसींसाठी राखीव झाला आहे. टाकळीढोकेश्वर, निघोज, जवळा, सुपा हे सर्वसाधारण खुले राहिले आहेत. आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले असून यात काहींची लॉटरी लागली आहे.

पारनेर पंचायत समितीच्या 12 गणांपैकी सहा गण हे महिलांसाठी आरक्षित झाल्याने तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ढवळपुरी, अळकुटी, निघोज गण निघाल्याने इच्छुकांच्या उड्या पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाडेगव्हाण, सुपा असे दोन गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी तर टाकळी ढोकेश्वर, वडझिरे, जवळा आणि कान्हुर पठार गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहेत. अशाप्रकारे पारनेर तालुक्यातील सहा गण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. पंचायत समितीसाठी इच्छुक असणार्‍या अनेक राजकीय पुढार्‍यांनी महिला आरक्षण जाहीर होताच गृहमंत्र्यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.

पंचायत समितीच्या 12 गणांसाठी आरक्षण सोडती कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडला. पारनेर तालुक्याची लोकसंख्या दोन लाख 61 हजार असून या लोकसंख्येवर आधारित व या अगोदर आरक्षण सोडत न झालेल्या प्रवर्गासाठी गणांची आरक्षण सोडत पार पडली आहे. पारनेर तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉ. सुधाकर भोसले व तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी सोडत जाहीर केली. अनेक पंचायत समिती गणात सर्वसाधारण जागेवर इच्छुक असणार्‍या उमेदवारांचा महिलांसह इतर प्रवर्गासाठी गण राखीव निघाल्याने हिरमोड झाला आहे.

पंचायत समिती निवडणुकीत सलग दोन पंचवार्षिक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिला राखीव असल्याने ते सर्वसाधारण व्यक्तीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या आरक्षण सोडतीकडे तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी व पक्षांनी पाठ फिरवल्याने राजकीय उदासीनता दिसून आली.

असे आहेत गट

ढवळपुरी- अनुसूचित जमाती, टाकळी ढोकेश्वर- सर्वसाधारण पुरुष, कान्हुर पठार- ओबीसी महिला, निघोज- सर्वसाधारण पुरुष, जवळा- सर्वसाधारण आणि सुपा- सर्वसाधारण असे आहेत.

गणांची आरक्षण

रांजणगाव मशिद- अनुसूचित जाती, भाळवणी- अनुसूचित जमाती, वासुंदे- ओबीसी, वाडेगव्हाण- ओबीसी महिला, सुपा- ओबीसी महिला, टाकळी ढोकेश्वर- सर्वसाधारण महिला, वडझिरे- सर्वसाधारण महिला, जवळा- सर्वसाधारण महिला, कान्हुर पठार- सर्वसाधारण महिला, ढवळपुरी- सर्वसाधारण व्यक्ती, आळकुटी- सर्वसाधारण, निघोज - सर्वसाधारण.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com