रानडुकरांचा शेतकर्‍यांवर हल्ला

रानडुकरांचा शेतकर्‍यांवर हल्ला

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील बाबुर्डी येथे दिवसाढवळ्या रानडुकरांकडून ग्रामस्थांवर हल्ला होत असल्याने वनविभागाच्यावतीने या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच प्रकाश गुंड याच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

खरीप हंगाम संपल्यानंतर सध्या रब्बी हंगामाची शेतकर्‍यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. यातच चालूवर्षी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकर्‍यांना शेतीची मशागत करताना मोठी कसरत करावी लागत आहे. गावातील देवराम भाऊ ठुबे हे दिवसा शेतात चालले असताना रानडुकराने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चालूवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी आहे. दुसरीकडे वाफसा झालेल्या शेतात मशागत करण्याचे काम शेतकर्‍यांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाने आठ दिवसांपासून विश्रांती दिल्याने रब्बी हंगामात पेरलेल्या ज्वारी, कांदा ही पिके सुकू लागल्याने त्यांना पाणी देण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. त्यातच रानडुकरांनी दहशत निर्माण केल्याने ग्रामस्थांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाबुर्डीसह भोयरे गांगर्डा, कडूस, रूईछत्रपती आदी गावांमध्ये रानडुकरांचे थवेच्या थवे तयार झाले असून हे शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. यात प्रमुख्याने कणिस लागलेली मका, भुईमूग, कांदा, ज्वारी आदी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. वन विभागाने या रानडुकरांचा पिंजरा लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच गुंड यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com