पारनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नुकसानीचे पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेश
पारनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

जून महिन्यापासून पारनेर तालुक्यात आज अखेर सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारीही जोराच्या पावसाने हजेरी लावली. पावसाने चालू वर्षाची सरासरी केव्हाच ओलांडली आहे. या सततच्या पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रब्बी हंगामाच्या पेरण्याही धोक्यात आल्या आहेत. भाजीपाला पिकेही सडून गेली तर फूल शेतीही कोलमडून गेली आहे. एंकदरितच एवढा पाऊस होऊनही शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट खते, बी बीयाणे, औषधे, मजुरी हे सर्व करताना बळीराजा अजूनच कर्जबाजारी झाला आहे. ऑक्टोबर महिना अर्धा संपत आला आसताना देखील रोज जोरदार पाऊस पडत आहे. हे प्रमाण गेल्या महिनाभरापासून खुपच असून यामुळे शेतमालाचे खुप नुकसान झाले आहे.

गेल्या आठ दहा दिवसांपासून पारनेर तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. हातातील सोयाबीन पीक कढणी वाचून तसेच वावरात पावसाच्या पाण्यात सडून चालले आहे. सर्वत्र जमिनीमध्ये पाणीच पाणी.सर्व जमिनी उपळल्या आसल्याने कुठलीच मशागत करूच शकत नसल्यामुळे सर्वत्र सर्व जमिनीवर गवताचा गुडघ्यापर्यंत वाढलेला थर पहावयास मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गातून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतमालाचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याची मागणी होत आहे.

याबाबत पारनेरचे तहसीलदार आवळकंठे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कृषी विभागामार्फत गावोगावच्या कृषी साह्यकांच्या मदतीने जिथे तक्रारी आल्या असतील तेथे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी कृषी सहाय्यकाच्या मदतीने नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन तहसीलदारानी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com