पारनेरमधील अनधिकृत कोविड हॉस्पिटलचा पर्दाफाश

पारनेरमधील अनधिकृत कोविड हॉस्पिटलचा पर्दाफाश

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर शहरामध्ये करोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठीची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता करोना रूग्णांवर उपचार करणार्या एका क्लिनीकवर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही कारवाई केली असून गांधी क्लिनिक असे कारवाई केलेल्या हॉस्पीटलचे नाव आहे.

पारनेर शहरासह तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वाढत आहे. तसेच रॅपीड अँटीजेन तपासण्या देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पारनेरमध्ये एक अभियान राबविण्यात येत असून तहसीलदार देवरे, पारनेर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुनिता कुमावत, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनशाम बळप आणि तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे ठिकठिकाणी भेटी देवून तपासणी करत आहेत. पारनेर शहरामध्ये तपासणी करत असताना गांधी क्लिनिक येथे करोनाबाधितांसाठी 20 बेड तयार करून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे निर्दशनास आले.

तहसिलदार देवरे यांनी तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधला असता सर्व रूग्ण करोनाबाधित असल्याचे निर्दशनास आले. डॉ. गांधी यांनी अशा रूग्णांची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी कोणतीही माहिती प्रशासनाला दिली नाही. डॉ. गांधी यांच्याकडे उपचार घेत असलेल्या सर्व रूग्णांना पुढील उपचारासाठी भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. डॉ. गांधी यांनी अनधिकृतरित्या कोविड रूग्णांवर उपचार केल्याने व त्या रूग्णांची माहिती प्रशासनाला न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यासंबंधीचा अहवाल पोलिस निरीक्षक बळप यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. गांधी यांच्याप्रमाणे तालुक्यातील खासगी वैद्यकिय व्यावसायिक करोना रूग्णांची माहिती प्रशासनाला देणार नाहीत किंवा संशयितांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रवृत्त करणार नाहीत, अशा डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार देवरे यांनी दिली आहे.

मेडिकल चालकांना दिले पत्र

पारनेर शहरातील वसंत मेडिकल येथे औषधे घेण्यासाठी रांगा होत्या. रांगेत उभे असलेल्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांचा समावेश असलेले रूग्ण होते. याठिकाणी डॉक्टरांच्या प्रिक्रीप्शनशिवाय औषधे व गोळ्या देण्यात येत होत्या. ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारच्या रूग्णांची माहिती प्रशासनाला देण्याची मेडिकल दुकानदारांची जबाबदारी असून तसे केले नाही. तसेच यापुढे असे संशयित औषधे घेण्यास आल्यास त्यांची माहिती प्रशासनाला देण्यासंबंधीचे पत्र मेडिकल चालकांना देण्यात आले. वैद्यकिय व्यावसायिक, सीटी स्कॅन सेंटर चालविणारे डॉक्टर आणि एक्स-रे सेंटर चालविणार्‍या संशयितांची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. माहिती न दिल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा तहसिलदार देवरे यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com