पारनेर तालुक्यात 13 दुकाने सील

43 गावांत लॉकडाऊनचे पालन : बहिर्जी नाईक पथकामार्फत प्रशासनास माहिती
पारनेर तालुक्यात 13 दुकाने सील

सुपा |वार्ताहर| Supa

पारनेर तालुक्यात (Parner Taluka) 43 गावांत आजपासून (शनिवार) दहा दिवसांसाठी लॉकडाऊन (Lockdown) करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devare) यांनी तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. निर्बंधांचे उल्लंघन (Violation of restrictions) केल्याने 13 दुकाने करोना कालावधी संपेपर्यंत सील करण्यात आली आहेत.

तालुक्यात शनिवारपासून 43 गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात आलेले आहे. मुख्य बाजारपेठ बंद असल्याने गावांमध्ये शांतता होती. तहसीलदार देवरे यांच्या पथकाने विविध गावांना भेटी देत पाहणी केली. लॉकडाऊनचे निर्बंध उल्लंघन केल्याप्रकरणी तालुक्यातील पारनेर 3, भाळवणी 3, टाकळी 2, वासुंदे 2, कान्हूर 2, जामगाव 1 अशी एकूण 13 दुकाने पथकाने करोना कालावधी संपेपर्यंत सील केली. तालुक्यातील इतर ठिकाणी मात्र सर्वत्र कडकडीत बंदचे पालन करण्यात आले होते, असे देवरे यांनी सांगितले.

निर्बंध मोडणार्‍या विरोधात कारवाई होणे गरजेचे असल्याने बहिर्जी नाईक पथक स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी बहिर्जी नाईक यांची भूमिका पार पाडत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार निर्बंध मोडणार्‍यांची माहिती विविध गावांतून पथकाला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली. काही गावांमध्ये शेतमाल विक्रीसाठी गर्दी होती.

त्याठिकाणी वाहनचालकांची तपासणी करण्याच्या सूचना ग्रामसुरक्षा समितीला केल्या. नियम डावलून दुकाने चालू ठेवल्यास ती करोना कालावधीपर्यंत सील केली जातील, तसेच कार्यक्रमात पन्नास व्यक्तींपेक्षा जास्त संख्या असल्यास मंगल कार्यालय सील केले जातील, अशा सूचना प्रशासनाने केल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत चालू राहणार्‍या हॉटेलची तपासणी करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती देवरे यांनी दिली.

या पथकामध्ये गटविकास अधिकारी किशोर माने, पोलीस उपनिरीक्षक उगले, सहाय्यक उपनिरीक्षक अशोक रोकडे, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींचा सहभाग होता.

प्रशासनाची नजर चुकवून नियमांचे उल्लंघन होते.त्यासाठी बहिर्जी नाईक पथकाने आपणास माहिती कळवावी. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

- ज्योती देवरे, तहसीलदार पारनेर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com