
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर तालुक्यात खरीप हंगामासाठी पावसाचे प्रमाण कमी असले तरी बळीराजाने धोका पत्कारून मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. तालुक्यात जूनअखेर 94 टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. आता शेतकर्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
साधारणपणे जून महिन्यांत शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागतो. जून महिन्यांत काही प्रमाणात पाऊस झाल्यावर बळीराजा पाभरी जुंपतात. मात्र, सध्या तालुक्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला असला तरी शेतकर्यांनी धोका पत्कारत मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी गायकवाड व सहायक कृषी अधिकारी गावडे यांनी सांगितले की, तालुक्यात 45 हजार 279 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून यात सर्वाधिक मूग व बाजरी पिकाची पेरणी झाली आहे. तालुक्यात पेरणी अशी मूग 13 हजार 895, बाजरी 13 हजार 362, सोयाबीन 3 हजार 560, मका 1 हजार 266, तूर 778, उडीद 164, चवळी 14, मटकी 43, वाल 523, हुलगा 42 व वाटाणा 3 हजार 561 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. हे प्रमाण तालुक्याच्या एकूण क्षेत्रापैकी 94 टक्के आहे.
तालुक्यात जूनअखेर सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असला पेरण्याचे प्रमाण चांगले आहे. तालुक्यात मे महिन्याच्या शेवटी व जून महिन्याच्या सुरूवातीस थोडा पाऊस झाला. त्यानंतर आषाढ महिन्यात जेमतेमच पाऊस असून श्रावण महिन्यांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पारनेर तालुका भौगलिकदृष्ट्या कमी पर्जन्यमान असलेला तालुका आहे. तालुक्याच्या दक्षिण बाजूने गेलेली कुकडी नदी व तालुक्याच्या उत्तर बाजूने गेलेली मुळा नदी या दोन नद्यांच्या परिसर व दक्षिण भागातून गेलेला कुकडी कॅनल याचा अपवाद वगळला तर तालुक्यातील बहुतांशी शेती ही पावसावर अवलंबून आहे.
कान्हुर पठार परिसरातील पठार भागात वाटाणा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर मूग व बाजरी ही पिके संपूर्ण तालुक्यातच मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तालुक्यात पावसाच्या तुलनेत पेरण्याचे प्रमाण चांगले असले तरी आता शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. बियाण्याच्या किंमती, दरवाढ होत असलेली खते, वाढणारे डिझेल दर पाहता दुबार पेरणी शेतकर्यांना परवडणारी नाही.