पारनेर तालुका सैनिक बँकेच्या सभासदवाढीला सहकारमंत्र्यांची स्थगिती!

पुढील सुनावणी 21 सप्टेंबरला; एकाच दिवशी वाढवले तब्बल 1405 सभासद
पारनेर तालुका सैनिक बँकेच्या सभासदवाढीला सहकारमंत्र्यांची स्थगिती!

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत आगामी काळात होणार्‍या निवडणुकीत पुन्हा आपल्याच मंडळाची सत्ता येऊन बँकेवर वर्चस्व राहावे, याच उद्देशातून काही पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी एकाच दिवसात तब्बल 1 हजार 405 जणांना सभासदत्व देण्यात आले होते. याविरोधात सहकार मंत्र्यांसमोर नुकतीच सुनावणी झाली असून यात बँकेच्या या सभासद नियुक्ती आदेशाला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत हा स्थगिती आदेश लागू असेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सभासद वाढविणार्‍या संबंधितांच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 154 अन्वये पुनरिक्षण अर्जावर सहकार मंत्री पाटील यांच्या पुढे 13 जुलै 2021 ला सहकार खात्याचे आधिकारी, बँक आधिकारी व तक्रारदार बाळासाहेब नरसाळे व तक्रारदार यांच्यावतीने विधिज्ञ आयेशा केशोडवाला यांची एकत्रित सुनावणी झाली होती. सैनिक बँक कर्मचारी, चेअरमन व काही संचालकांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन व बँकेच्या पोटनियमाचे व कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन करत नियमबाह्य सभासद केल्याचा युक्तिवाद विधीज्ञ केशोडवाला व नरसाळे यांनी केला.

सहकार मंत्री पाटील यांनी या मुद्यावर व कायदा व बँक पोटनियमाचे अवलोकन केले असता असा निष्कर्ष काढला, की बँकेने केलेली सभासद वाढ ही कायद्यातील तरतूद व बँकेच्या उपविधीचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे केली आहे.त्यामुळे बेकायदेशीर झालेल्या सभासदांना पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती दिली असून पुढील सुनावणी 21 सप्टेंबरला ठेवण्यात आली आहे. सैनिक बँकेत सत्ताधार्‍यांनी लोकशाहीचा अवमान करत बेकायदा, नियमबाह्य सभासद प्रक्रिया राबवून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले होते. मात्र सहकार मंत्र्यांनी स्थगिती देऊन सत्ताधार्‍याच्या या नितीला पायबंद घातला आहे.

मतदानाचा अधिकार सर्व सभासदांना !

सहकारी संस्थांच्या निवडणुकीत आता सर्वांनाच मताधिकार असून 97 व्या घटना दुरुस्तीनुसार क्रियाशील सभासदांनाच मताचा अधिकार होता. परंतु कोविडमुळे 31 मार्च 2022 पूर्वी होणार्‍या सर्व संस्थांच्या निवडणुकीत क्रियाशील अथवा अक्रियाशील हे निकष राहणार नाहीत, असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.शासनाच्या या निर्णयामुळे चालू वर्षी होणार्‍या निवडणुकीत बँकेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या 10 हजार 120 सभासदांना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहील असे सैनिक बँक सभासद नरसाळे, कॅप्टन विठ्ठल वराळ, संपत शिरसाठ,मारुती पोटघन,विनायक गोस्वामी, विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले.

मनसुब्यावर पाणी !

सैनिक बँकेच्या संचालक मंडळाची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत व केलेल्या गैरकारभार दडपण्यासाठी चेअरमन शिवाजी व्यवहारे, संजय तरटे, शिवाजी सुकाळे, नामदेव काळे मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे, अनिल मापारी, रमेश मासाळ, संतोष भनगडे, आप्पा थोरात, राजेंद्र ढवण, आकाश काकडे, बबन फंड, भरत पाचारणे, सदाशिव फरांडे या कर्मचार्‍यांनी 1 हजार 405 नातेवाईकांना सभासद केले. मात्र सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने चेअरमन, मुख्यकार्यकारी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com