पारनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमात

माफियांना रोखण्यात महसूल यंत्रणा अपयशी
पारनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमात

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील मुळा, मांडवा नदीपात्रांतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असून, तो रोखण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरले आहे. महसूलच्या स्थानिक अधिकार्‍यांशी हातमिळवणी करून माफियांकडून जोमात वाळू उपसा केला जात आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी यांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संबंधितांना कोणाचही धाक राहिला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे.

मांडवा नदीपात्रामध्ये सर्रास जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने वाळू उत्खनन केले जात आहे. डंपर, ट्रॅक्टर व ट्रकच्या साहाय्याने वाहतूक केली जात आहे. हे नदीपात्र गेल्या अनेक वर्षांपासून वाळू माफियांचा अड्डा बनले आहे. हा अवैध वाळूउपसा रोखण्याचे मोठे आव्हान तालुक्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांसमोर आहे. पारनेर तहसीलदारपदाचा नुकताच कार्यभार हाती घेतलेले शिवकुमार आवळकंठे हे वाळू माफियांना रोखण्याचे आव्हान ते कसे पेलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पारनेर हा दुष्काळी तालुका ओळखला जात असला, तरीही तालुक्यात पडणार्‍या पावसामुळे ठिकठिकाणी वाहणार्‍या ओढ्या नाल्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये वाळू वाहून येते. तालुक्यातील उत्तरेला असणार्‍या मांडवा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळू आहे. अनेक दिवसांपासून या भागांमध्ये वाळूचे लिलाव होत नाहीत. त्याचा फायदा वाळू माफियांना होत असून, ते छुप्या पद्धतीने व काही अधिकार्‍यांच्या संगनमताने वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करतात. अनेकवेळा वाळू माफियांच्या हैदोसामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. वेळोवेळी या भागातील नागरिकांनी आवाज उठविला. मात्र, अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच, वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांमुळे या भागातील रस्त्यांची व पिकांची दुरवस्था झाली आहे. स्थानिक कर्मचार्‍यांना हाताशी धरून प्रशासकीय अधिकार्‍यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करत राजरोसपणे माफिया वाळू चोरून नेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com