पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार

तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींची निवडणूक रंगणार
पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झाला असून पारनेर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली असून गावकी - भावकीच्या राजकारणाला वेग येणार आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी, पळशी, पाडळीतर्फे कान्हुर, कोहो कडी, गोरेगाव, म्हस्केवाडी, सिद्धेश्वरवाडी, हत्त लखिंडी, करंदी, पिंपळगाव तुर्क, वनकुटे, भोंद्रे, पुणेवाडी, गुणोरे, ढवळपुरी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यात होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल ,अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आली आहे.

या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

पारनेर तालुक्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेना या दोन पक्षांत अगोदरच उभा दावा आहे. यात आता शिंदे गटाची शिवसेना, भाजप, विखे गट, थोरात गट तसेच स्थानिक गट तट असल्याने या निवडणुकीमुळे आता गावागावांमध्ये गावकी -भावकीचे वाद पेटणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com