तहसीलदार देवरेंविरोधात कर्मचार्‍यांनी थोपटले दंड

दडपशाहीचा आरोप करत तलाठी, मंडल अधिकारी यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
तहसीलदार देवरेंविरोधात कर्मचार्‍यांनी थोपटले दंड

अहमदनगर | प्रतिनिधी

तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Devre) यांची ऑडिओ क्लिप (Audio Clip) राज्यभर व्हायरल झाली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिले. मात्र आता देवरे यांच्या समवेत काम करणारे त्यांच्या हाताखालील कर्मचारीच आता देवरे यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यांनी तहसील कार्यालयासमोरच बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.

तहसीलदार देवरेंविरोधात कर्मचार्‍यांनी थोपटले दंड
Video : पारनेर ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट, पाहा नेमकं काय म्हणाल्या तहसीलदार देवरे

पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटना (Parner Taluka Revenue Employees and Talathi Association) तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप करत चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना व मुख्य सचिवांना निवेदन दिले होते. दोन दिवसांपूर्वी संघटनेने निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनाही मागणीचे निवेदन दिले होते. या निवेदनातून तहसीलदार देवरे यांची बदली करा अथवा आमच्या सर्वांच्या पारनेर तालुक्यातून बदल्या करा, अशी मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण होत नसल्याने पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी व पारनेर तालुक्यातील तहसीलदार मंडलाधिकार्‍यांनी देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.

तहसीलदार देवरे या कर्मचार्‍यांवर दडपशाही करतात, दबाव टाकतात, सूड भावनेची वागणूक देतात असे आरोप करत त्यांच्या विरोधात महसूल सहाय्यक व पारनेर तलाठी कर्मचारी संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनात महेंद्र रोकडे, एस.यू. मांडगे, एम.आर.उडे, पी.बी.जगदाळे, डी.डी.पवार, एस. एस.गोरे, ए.ल निकाळजे, रविंद्र शिंदे, ए.एम गायकवाड, डी. यु चव्हाण, व्ही.व्ही वैराळकर, ए.के लांडे, एस.ई पवार, बी.एम कुसमुडे, डी.डी कदम, ए.बी मंडलिक आदीसह महसूल सहाय्यक व तलाठी कर्मचारी संघटना पारनेर चे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे पारनेर तालुक्यातील महसूलचा कारभार ठप्प झाला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, देवरे या राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्यासारखे वागतात. कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देत असल्याने येथे काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. याविषयी विचार करून एक तर आम्हा सर्व कर्मचार्‍यांची तालुक्यातून बदली करावी नाहीतर देवरे यांची बदली करावी, ही मागणी मान्य होत नसल्याने बेमुदत कामबंद आंदोलन करत असल्याचे कर्मचार्‍यांनी म्हटले आहे. यासंदर्भात देवरे यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

महसूल बुडविला..

गौण खनिज उत्खनन व वाहतूक याबाबत कर्मचारी पथक यांनी कारवाई केलेली अनेक वाहने कुठलाही शासकीय दंड वसूल न करता सोडून दिलेली आहेत. तहसीलदार पारनेर यांनी कोट्यवधी रुपये रकमेचा शासकीय महसूल बुडविला आहे त्याविषयी चौकशी अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. कार्यालयीन खर्च निधीतून कर्मचारी यांना साधी टाचणी देखील पुरवलेली नाही, अशा अनेक तक्रारी निवेदनात कर्मचार्‍यांनी मांडल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com