पारनेर-संगमनेर सीमेवर ऊस वाहतूक रोखली

भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक
पारनेर-संगमनेर सीमेवर ऊस वाहतूक रोखली

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

केंद्र आणि राज्यासह साखर कारखान्यांचे उसासंदर्भात विविध मागण्यांसाठी लक्ष वेधण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी17 व 18 नोव्हेंबर रोजी राज्यभर ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील लिंब फाट्यावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ऊस वाहतुक करणारे टॅक्टर रोखले.

गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवसात शेतकर्‍यांनी ऊस तोड करू नये, रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे. असे आवाहन संघटनेने केले होते. परंतू तरीदेखील ऊस वाहतूक होत असल्याचे भूमिपुत्रच्या निदर्शनास आल्याने मांडवे बुद्रुक येथील लिंब फाट्यावर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश सचिव किरण वाबळे, तालुका कार्याध्यक्ष संजय भोर, माजी चेअरमन संजय भोर, नंदन भोर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दरेकर , मांजाबापू वाडेकर, सुरेश गोळे, संतोष गागरे, ठमाजी भोर, राजु रोकडे, सुनील गागरे, माऊली गागरे, काशिनाथ गोळे यांच्यासह शेतकर्‍यांनी ऊसाचे ट्रॅक्टर कारखान्याकडे जात असताना रोखून धरले आहे. त्यामुळे आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे.

चालू गळीत हंगामात एक रकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफ.आर.पी. अधिक 200 रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा, केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3500 करावा, इथेनॉलच्या दरात 5 रुपयांची वाढ करावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची आहे. या मागण्या मान्य न केल्याने भूमिपूत्र शेतकरी संघटनेने या आंदोलनाला आज सकाळपासूच सुरुवात केली आहे. दोन दिवस ऊसाचे एकही टीपरू कारखान्याला जाऊ देणार नाही असा एल्गार पुकारत ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलन चिघळण्याची शक्यता

विविध शेतकरी संघटनांनी दोन राज्यभर ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे. तसे आवाहन त्यांनी ऊसतोड मजुर, शेतकरी, वाहतुकदार व कारखान्यांना केले आहे. पंरतु तरिही काही कारखाने ऊस तोड व वाहतुकीसाठी टोळ्यांवर दबाव आणत आहेत. अशी वाहने रस्त्यांवर दिसल्यास त्यांची तोडफोड तसेच जाळपोळ होण्याची भिती वाहतुकदारांकडून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com