पारनेरच्या सहयोग खाद्यतेल कंपनीचा परवाना निलंबित
सार्वमत

पारनेरच्या सहयोग खाद्यतेल कंपनीचा परवाना निलंबित

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर येथील मे. सहयोग ट्रेडिंग या खाद्यतेल कंपनीच्या तपासणीमध्ये त्रुटी आढळून आल्याने व नोटीस पाठवून देखील योग्य खुलासा न केल्याने या खाद्यतेल आस्थापनेचा परवाना सुधारणा करेपर्यंत निलंबित करण्यात आला असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त संजय शिंदे यांनी दिली.

मे. सहयोग ट्रेडिंग या खाद्यतेल कंपनीची अन्न सुरक्षा अधिकारी यांनी 22 ऑक्टोबर 2019 मध्ये तपासणी केली होती. यावेळी कंपनीच्या तपासणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. यात्रुटी दूर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी कंपनीला सुधारणा नोटीस पाठवली होती.

त्यानंतर डिसेंबर 2019, मार्च 2020 व जून 2020 दरम्यान कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसबाबत कंपनीचे मालक स्वप्नील बोरा यांनी कोणतेही उत्तर दिले नाही, तसेच कंपनीच्या कामकाजात सुधारणा केल्या नाहीत. यामुळे आयुक्त शिंदे यांनी कंपनीच्या कामकाजात सुधारणा होईपर्यंत परवाना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

या परवाना निलंबनावर परवानाधारक स्वप्नील बोरा यांनी हरकत घेऊन अन्न प्रशासन आयुक्त, मुंबई यांच्याकडे ऑनलाईन अपील दाखल केले. या अपीलावर सुनावणी झाली. बोरा यांनी कंपनीमध्ये काहीच सुधारणा केल्या नसल्याने सहाय्यक आयुक्त, नगर यांनी दिलेला निर्णय अन्न प्रशासन आयुक्त, मुंबई यांनी कायम ठेवला आहे.

यामुळे सहयोग खाद्यतेल कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या निलंबित कालवधीत कंपनीला कोणतेही खरेदी-विक्री व्यवहार करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com