कारागृहात बोठेकडून मोबाईलचा वापर

कारागृहात बोठेकडून मोबाईलचा वापर

आणखी एक गुन्हा दाखल होणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर उपकारागृहातील आरोपींकडे मागील महिन्यांत दोन मोबाईल आढळून आले होते. या मोबाईलचा वापर रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याने केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नगर ग्रामीणचे उपअधीक्षक अजित पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला. बोठेने मोबाईलचा वापर केल्याने त्याच्याविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे.

मागील महिन्यांत उपअधीक्षक पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती. यावेळी कारागृहातील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डिले यांच्या अंगझडतीत दोन मोबाईल आढळून आले होते. त्यांना जेवण देणारे सुभाष लोंढे, प्रविण देशमुख (रा. सुपा ता. पारनेर) यांनी हे मोबाईल आरोपींना पोहच केले होते.

यामुळे पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप करीत आहेत. ज्या बराकीत मोबाईल सापडले तेथे बाळ बोठेला ठेवण्यात आले होते. यामुळे बोठेने त्या मोबाईलचा वापर केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास केला असता बोठे याने त्या मोबाईलचा वापर केला आहे. यामुळे बोठेला कारागृहात मोबाईल वापरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे.

दरम्यान, जरे हत्याकांडातील गुन्ह्यात आरोपी असलेल्या बोठे याने मोबाईलचा वापर केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलद्वारे त्याने कोणाला फोन केले. त्यातून काय संभाषण झाले याचा संपूर्ण तपास पोलीस करीत आहेत.

मोबाईल देण्यात महिलेचा सहभाग

कारागृहात जेवण देण्यासाठी ठेकेदार नियुक्त केले जातात. पारनेर उपकारागृहात आरोपींना जेवण देणार्‍या सुभाष लोंढे, प्रविण देशमुख यांनी आरोपींना मोबाईल दिल्याने त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मोबाईल देण्यात एका महिलेचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे त्या महिलेला या गुन्ह्यात आरोपी केल्याचे उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com