पारनेर पोलिसांच्या हाती चाळीस संशयितांची यादी

जवळाप्रकरणी पाच संशयितांची डीएनए तपासणी
पारनेर पोलिसांच्या हाती चाळीस संशयितांची यादी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील जवळा येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या घटने प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच संशयितांची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. तर पोलिसांकडे सुमारे चाळीस जणांची यादी हाती असल्याचे सुत्रांनी सांगितले.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली असून सर्व पथके अहोरात्र तपास करत आहेत. अतिशय नियोजनबध्द पध्दतीने करण्यात आलेल्या या गुन्हयाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. या तपासाबाबत पोलिसांकडून अतिशय गुप्तता पाळण्यात येत आहे. तपास योग्य दिशेने सुरू असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याचा तपशील मात्र सार्वजनीक केला जात नाही. या गुन्ह्याच्या मुळापर्यंत लवकरच जाऊन आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जवळा येथे अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्यात आला व त्यानंतर तिचा खून करण्यात आला. या घटनेने जिल्हा हादरून गेला असून या प्रकरणी विविध ठिकाणी आंदोलने झाली. तसेच विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी जवळा येथे येऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. लवकरात लवकर यातील आरोपींना पकडण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

तांत्रिक तपासालाही गती

पोलीसांनी या घटनेशी निगडीत तांत्रिक बाबींवरही लक्ष केंद्रीत केले असून मुलगी वापरीत असलेल्या मोबाईलमधील सीमकार्ड, त्या नंबरवर झालेले काही दिवसांपासूनचे फोन कॉल याचाही छडा लावला जात आहे. या भागात संशयित वाटणार्‍या अनेकांना पोलिसांचा खाक्याही दाखविण्यात आला,तरीही पाच दिवस होऊनही घटनेच्या मुळापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले नाही.

Related Stories

No stories found.