पारनेरमध्ये ऑक्सिजन प्रकल्प, 100 ऑक्सिजन बेडची सुविधा

तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आणखी एक रुग्णवाहिकाही मिळणार
पारनेरमध्ये ऑक्सिजन प्रकल्प, 100 ऑक्सिजन बेडची सुविधा
File Photo

पारनेर/सुपा |प्रतिनिधी| Parner

करोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पारनेरमधील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीस सुरूवात झाली आहे. तेथेच ऑक्सिजनचे 100 बेड असलेली सुविधा तसेच आणखी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून देशभर करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर विशेषतः पारनेर तालुक्यात प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या बरोबरीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्याचे सांगून यावेळी आ. लंके म्हणाले, तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिक नोकरी तसेच उद्योगांच्या निमित्ताने मुंबई तसेच पुण्यामध्ये मोठ्या संख्येने आहेत. करोनाचा प्रादुर्भाव या शहरामंध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तेथे राहणारे तालुक्यातील हजारो नागरिक गावाकडे परतले. त्यामुळे करोनाचा संसर्ग पारनेर तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक होण्याचा धोका होता.

मात्र, बाहेरगावावरून आलेल्या नागरीकांची तपासणी करून त्यांचे विलगीकरण करण्यात आल्याने मोठा संसर्ग होण्याचा धोका टाळण्यात यश मिळविण्यात आले. करोना बाधितांवर उपचार करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात आली. पहिल्या लाटेत कर्जुलेहर्या व दुसर्‍या लाटेत सध्या भाळवणी येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आजवर तेथून सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेऊन परतले आहेत, तर सध्या एक हजार रुग्ण उपचार घेत आहेेत.

रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना तालुक्यातच उपचार मिळावेत यासाठी आता पारनेरच्या ग्रामिण रुग्णालयात 100 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी तेथेच ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून या प्रकल्पामधून दररोज ऑक्सिजनचे 125 सिलेंडर उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी 17 लाख रुपये किमतीचे जनरेटरही बसविण्यात येणार आहे.

पारनेरला गॅस दाहिनी

करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनंत अडचणी येत असून त्यावर मात करण्यासाठी पारनेर शहरातील स्मशानभूमित आधुनिक गॅस दाहीनी उभारण्यात येत असून लवकरच तिचा वापर सुरू होईल असेही आमदार लंके यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com