
पारनेर (तालुका प्रतिनिधी)
निघोज येथे सहा वर्षांपूर्वी झालेली दारुबंदी कायदेशीरच असल्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने नुकताच दिल्यानंतर आता राज्य शासनानेही निघोजला कायमची दारूबंदी जाहीर केली आहे.
यापूर्वी उच्च न्यायालयाने दारूबंदी हटवण्याची दारू विक्रेत्यांची मागणी फेटाळताना राज्य सरकारकडे त्यांना दाद मागण्याची मुभा राखून ठेवत निकाल दिला होता. त्यानंतर निघोज येथील विजय पोपट वराळ यांनी दारू विक्रेत्यांच्यावतीने राज्य सरकारचे प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांच्याकडे दारूबंदी हटवण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता न्यायालया पाठोपाठ राज्य सरकारनेही निघोजला दारूबंदी लागू केली आहे.
निघोज येथील महिलांच्या ऐतिहासिक लढ्यानंतर मतदानातून बहुमताने येथे दारुबंदी करण्यात आली होती. त्यानंतर येथील सात परवानाधारक दारू दुकाने जिल्हाधिकारी नगर यांनी बंद केली होती. पुढे दोन वर्षांनंतर दारू विक्रेत्यांनी येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांशी संगनमताने गावात दारू बंदी उठवणारा बनावट ठराव दाखवून दारू दुकाने पुन्हा सुरू केली होती. येथील दारू दुकाने पुन्हा चालू झाल्यानंतर दारूबंदी समिती व लोकजागृती सामाजिक संस्थेच्या विश्वस्त कांता लंके, राधाबाई पानमंद, शांताबाई भुकन यांनी जिल्हाधिकार्यांच्या दारूबंदी हटवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्याच्या मुख्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्याकडे आव्हान दिले होते.
मुंबईत राज्य आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या दारू बंदी उठवण्याचा निर्णयाला बेकायदेशीर ठरवून स्थगिती दिली होती. त्यामुळे पुन्हा एकदा निघोजला परवानाधारक दारू दुकाने बंद करण्याचे आदेश निघाले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निघोजला पुन्हा दारू बंदी जाहीर केल्याच्या निर्णयाला दारू विक्रेत्यांच्यावतीने विष्णू श्रीहरी लाळगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देवून राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
या याचिकेच्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांनी निघोजच्या दारूबंदी निर्णय योग्य असण्यावर शिक्कामोर्तब केले होते. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त व न्यायालयाच्या निर्णयाला दारू विक्रेत्यांकडून पुन्हा राज्य सरकारकडे आव्हान देण्यात आले होते. आता तेही फेटाळण्यात आले आहे. यामुळे निघोजमध्ये दारूची बाटली कायमची आडवी झाली आहे.