पारनेर : राष्ट्रवादीचा सेनेला दे धक्का !

पारनेरातील 5 नगरसेवकांचा प्रवेश, नगर जिल्ह्यात ठिणगी
पारनेर : राष्ट्रवादीचा सेनेला दे धक्का !

पारनेर (तालुका प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायतीतील शिवसेनेच्या पाच विद्यमान नगरसेवकांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीने सुरुंग लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सरकारमध्ये एकत्र असतानाच या राजकीय घडामोडीमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादीने पारनेरमध्ये हळूहळू शिवसेनेला खिंडार पाडण्यास सुरूवात केली आहे. पारनेरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. आज त्याला मूर्त स्वरूप मिळाले. आ. निलेश लंके यांनी माजी आ. विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून शिवसेनेच्या पाच नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये पावन करून घेतले आहे.

बारामती येथे शनिवारी (दि.4) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या या पाच नगरसेवकांनी व काही पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष औटी यांच्या स्थानिक राजकारणाला जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमाताई बोरुडे यांच्यासह डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली आनंदा औटी, नंदा देशमाने हे पाच नगरसेवक त्याचप्रमाणे उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडे यांच्यासह काही शिवसैनिक राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेले सर्वच पदाधिकारी व नगरसेवक औटी यांचे कट्टर व एकनिष्ठ कार्यकर्ते समजले जात होते.

आ. लंके यांची विधानसभा निवडणुकीनंतर पारनेर तालुक्याच्या राजकारणावरील पकड घट्ट होत असून, भविष्यात तालुक्यातील अनेक विरोधक त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत आल्यास नवल वाटू नये, अशी स्थिती आहे. आजच्या राजकीय खेळीतून आमदार लंके यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पारनेर नगरपंचायतीची पंचवार्षिक मुदत चार महिन्यांत संपणार आहे. पारनेर नगरपंचायत यावेळी कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्यासाठी आ. लंके यांनी कंबर कसली आहे. प्रत्येक प्रभागनिहाय नियोजनही सुरू केले असून अनेक इच्छुक आहेत. बारामती येथे आ. लंके, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, युवक तालुकाध्यक्ष अशोक घुले, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, दिनेश औटी, विलास सोबले, उद्योजक विजय औटी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची सत्ता आहे. मात्र असे असले तरी तिन्ही पक्षांत मतभेद असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. सरकार निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेत नसल्याने काँग्रेस नेते नाराज होते. तर लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासगीत बोलत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीने शिवसेनेचे पाच नगरसेवक आपल्या गळाला लावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या लवकरच राजकारणात येणार आहेत. 7 जुलै रोजी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यातील मार्केट यार्ड येथील ‘निसर्ग’ या पक्षाच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तसेच प्रिया बेर्डे यांच्यासोबत ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, मूळ नगरच्या लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com