सेना-राष्ट्रवादी वादामुळे पारनेर बंद

लंके प्रतिष्ठाणला जागा देण्यास विरोध
सेना-राष्ट्रवादी वादामुळे पारनेर बंद

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर नगर पंचायत हद्दीत हॉस्पिटल उभारणीसाठी शहरातील गट नंबर 96 मधील 6 हेक्टर 29 गुंठे इतकी जमीन नीलेश लंके प्रतिष्ठानला देण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठराव विशेष सभेत मांडला होता. मात्र, या ठरावाला विरोध करत शिवसेना नगरसेवकांनी स्पष्ट नकार देत सभात्याग केला. तसेच पारनेर बंदची हाक दिली. सेना- राष्ट्रवादीच्या या वादामुळे शनिवारी पारनेर शहरातील सर्व कारभार ठप्प होते.

या ठरावाला विरोध करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना चार नगरसेवकांनी निवेदन दिले होते. शिवसेना विरोधानंतर जागा देण्याचा निर्णय होत असल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला. निवेदनात यांनी म्हटले आहे, एका प्रतिष्ठानने पारनेर नगर पंचायतीची 6 हेक्टर 29 आर जागेची वैयक्तिक हॉस्पिटल उभारणीसाठी मागणी केली आहे. ही जागा सरकारी आहे. ती प्रतिष्ठानला देण्यास शिवसेना नगरसेवकांची तीव्र हरकत आहे.

या जागेचा उपयोग गावातील शासकीय कार्यालय सध्या दुरावस्थेत कार्यालयासाठी होऊ शकतो. वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यात गावातील जनतेसाठी व्यायाम, फिरण्यासाठी ट्रॅक, बगीचा या अनेक गोष्टी करण्यासाठी उपयोगात आणू शकते. गावाची वाढती लोकसंख्या पाहाता गावाला स्टेडियम, स्विमिंग पूल, ट्रॅक तसेच नगर पंचायत हद्दीमध्ये यासारख्या अनेक सुविधा असाव्या लागतात. त्यासाठी भविष्यात या जागेचा उपयोग होऊ शकतो.

घरकुल, महाडा तसेच इतर शासकीय घरांचे प्रकल्प बसवण्याचे झाल्यास सध्यस्थितीत नगर पंचायतीकडे जागा उपलब्ध नाही. त्यासाठी या जागेचा उपयोग होऊ शकतो. गावातील पाणी पुरवठा पाईपलाईन हंगा तलावातून येते, हे सर्वांना ज्ञात आहेत. त्यामुळे भविष्यात जलशुद्धीकरण प्रकल्प बसवण्यासाठी ही या जागेचा उपयोग होऊ शकतो. अशी कारणे शिवसेनेच्या नगरसेवकांनी निवेदनमध्ये दिली होती. नीलेश लंके प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वादामुळे शनिवारी पारनेर शहर बंद होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com