खुनाच्या गुन्ह्यात चौघांना जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल || पारनेर तालुक्यातील घटना
खुनाच्या गुन्ह्यात चौघांना जन्मठेप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खून केल्याप्रकरणी चार आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी दोषीधरून जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल केदार गोविंद केसकर यांनी काम पाहिले.

सुखदेव बाबुराव रावडे, गणपत सुखदेव रावडे, संदीप पोपट रावडे, संपत पोपट रावडे (सर्व रा. कडूस ता. पारनेर) अशी शिक्षा झालेल्या चार आरोपींची नावे आहेत. त्यांनी भाऊसाहेब नामदेव रावडे यांचा खून केला होता. या घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, 11 ऑक्टोबर 2010 रोजी सायंकाळी बबन रामदास घालमे यांची जनावरे सुखदेव रावडे याच्या पिकात गेली. ती त्याने बांधून ठेवली. सदरची जनावरे सोडण्यासाठी राणी बबन घालमे या विचारण्यास गेल्या असता, सुखदेवने जनावरे सोडली नाहीत. त्यानंतर बबन जनावरे सोडविण्यास गेले असता त्यांना सुखदेवने शिवीगाळ केली.

त्यावेळी तेथे भाऊसाहेब नामदेव रावडे, विलास बाळासाहेब रावडे हे आले असता सुखदेव रावडे, गणपत सुखदेव रावडे, संदीप पोपट रावडे व संपत पोपट रावडे यांनी बबन घालमे, भरत उर्फ सुनील बाळासाहेब रावडे यांना मारहाण केली. सुखदेव रावडे याने लाकडी लोढण्याने भरत रावडे, भाऊसाहेब रावडे यांना मारहाण केली. तसेच संदीप रावडे याने बबन घालमे यांना मारहाण केली. सदर मारमारीमध्ये भाऊसाहेब नामदेव रावडे यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांच्यावर प्रथमतः सुपा येथील खासगी रूग्णालयात उपचार केले.

परंतु जखमी भाऊसाहेब रावडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर त्यांना नगर येथे व नंतर पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान जखमी भाऊसाहेब रावडे यांची प्रकृती खालवल्याने त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी भरत उर्फ सुनील रावडे यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात आरोपींविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकार्‍यांनी घटनेचा तपास पूर्ण करून आरोपींविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्यावतीने एकूण आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. या खटल्यामध्ये फिर्यादी, जखमी साक्षीदारांवर उपचार करणार्‍या डॉ. शितल सुभाष गोसावी, डॉ. बाळासाहेब पठारे, मयताचे शवविच्छेदन करणारे डॉ. अमोल बळवंत शिंदे तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाला पैरवी अधिकारी एस. जी. वाघमारे यांनी सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com