पारनेरच्या नगराध्यक्षांची अधिकार्‍यास मारहाण

अभियंत्यानेच अरेरावी केल्याचा नगराध्यक्षांचा आरोप
पारनेरच्या नगराध्यक्षांची अधिकार्‍यास मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तसेच त्यांच्या समर्थकांनी अभियंत्यास मारहाण केल्याचा प्रकार आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. मात्र पाणीपुरवठा अभियंत्यानेच आपणास अरेरावी केल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय औटी यांना केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरास पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत व्हावा, अशी आजी-माजी पदाधिकार्‍यांनी मागणी होती. हंगे तलावातून पाणीपुरवठा करणार्‍या मोटारींचा लिलाव करून नव्या मोटारी खरेदी कराव्यात व पाणी पुरवठा सुरळीत करावा, असा निर्णय सभेत झाला होता. अद्यापही याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने याबाबत औटी यांनी तेथील अभियंता सचिन राजभोग यांना विचारणा केली. यावेळी राजभोग यांनी एकेरी भाषेत ‘माझ्याशी नीट बोलायचे’ असे बोलत अरेरावीची भाषा वापरली.

त्यामुळे संतप्त औटी व नागरिक तसेच कर्मचारी यांच्यात हमरीतुमरी झाली. दरम्यान यासंदर्भात नगराध्यक्ष विजय औटी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पारनेर शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर बनला आहे. आ. लंके यांच्या माध्यमातून येत्या काही महिन्यांतच हा प्रश्न सुटणार आहे, मात्र प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी पाणीप्रश्नाला जबाबदार असून यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरली. हे न पटल्याने तेथे उपस्थित नागरिक व त्यांची हमरीतुमरी झाली. दरम्यान अभियंता राजभोग यांची बदली करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार

गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या पाणीपुरवठा बाबत सर्वेक्षण सुरू आहे. कर्मचारी व तांत्रिक कर्मचारी वेळेवर येत नाही. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. परंतु याप्रश्नी अधिकार्‍याला मारहाण होणे उचित नाही. यासंदर्भात लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत.

Related Stories

No stories found.