पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

बिनविरोध ग्रामपंचायतीसंदर्भात आ. निलेश लंके यांच्या आवाहनास तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत असून

सोमवारी भाळवणी येथे झालेल्या बैठकांमध्ये हिवरेकोरडा, वेसदरे, सारोळा आडवाई व भांडगाव येथील ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध करण्याचा आ. लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकांत निर्णय घेण्यात आला.

चारही गावच्या पदाधिकार्यांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यात सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. आ. लंके यांच्या उपक्रमाचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वागत करून निवडणुकीच्या निमित्ताने होणारे मतभेद या निर्णयामुळे दूर होणार असल्याच्या प्रतिक्रीया यावेळी देण्यात आल्या. आम्ही वेगवेळ्या पक्षाचे कार्यकर्ते असलो तरी गावातील शांतता अबाधित राहण्यासाठी आ. लंके यांचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याची भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

कोणताही राजकिय अभिनिवेश न ठेवता आ. लंके यांनी कुटुंबप्रमुख या नात्याने सर्वांना एकत्र केले. यात आम्हा कार्यकर्त्यांना आनंद असून बिनविरोध निवडणुकीनंतर आमच्या गावास 25 लाखांची विकास कामे मिळणार आहेत ही ग्रामस्थांसाठी मोठी उपलब्धी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

एकदा 25 लाखांचा निधी दिल्यानंतर त्यानंतरही संबंधित गावांच्या विकास कामांसाठी प्राधान्य देऊ, अशी ग्वाहीदेखील आ. लंके यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना दिली. विविध गावांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकार्यांशी संवाद साधताना आ. लंके यांनी मतभेद दूर ठेवून सर्वजण एकत्र आल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

राजकारणासाठी किती दिवस संघर्ष करणार? असा सवाल करून दोन दिवसांच्या राजकारणासाठी कायमचा अबोला धरण्यापेक्षा एकत्र या, तुम्हीच निर्णय घ्या, मी तुम्हा सर्वांच्या पाठीशी खंबीर उभा राहील, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. आता नवे पर्व सुरू करू, गावाचा विकास करू, मतभेद दूर करून राज्यात वेगळा संदेश देऊ असेही आ. निलेश लंके यांनी यावेळी सांगितले.