पारनेर कारखाना सभासद ताब्यात घेणार

शेतकरी-कामगार महासंघाच्या बैठकीत सभासदांचा निर्धार
साखर कारखाना
साखर कारखाना

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर सहकारी साखर कारखान्याची विक्री बेकायदेशीर झाली असून हा कारखाना सभासदांचाच आहे. यामुळे लवकरच सभासद, शेतकरी व कामगार पारनेर कारखान्याचा ताबा घेणार असल्याची घोषणा देवीभोयरे येथील शेतकरी कामगार महासंघाच्या बैठकीत करण्यात आली. राज्य सहकारी बँकेतील घोटाळा उघड करणारे शेतकरी-कामगार नेते माजी आ. माणिकराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्य सहकारी बँकेने किरकोळ कर्जासाठी पारनेर साखर कारखान्याची बेकायदेशीर विक्री केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पारनेर कारखान्यांची विक्री नसून तो क्रांती शुगरचा अतिक्रमण व कब्जा असल्याचा घणाघाती आरोप माजी आ. जाधव यांनी यावेळी केला. हा ताबा मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेची ताकद पारनेर कारखान्याच्या सभासदांना व शेतकर्‍यांना देणार असून अतिक्रमण काढल्यासारखा हा ताबा उलथवुन टाका असे आवाहन जाधव यांनी पारनेरकरांना केले.

राज्य सहकारी बँकेच्या चौकशी अहवालात पारनेर कारखान्याला बेकायदेशीर विकल्याचा ठपका देखील ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पारनेरप्रमाणे राज्यातील इतर 49 सहकारी कारखाने राज्य सहकारी बँकेने विकले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानंतर या बॅकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे. सुप्रीम कोर्टानेही या गुन्ह्याला स्थगिती नाकारली आहे. आता या गुन्ह्याचा तपास सध्याचे राज्य सरकार करू इच्छित आहे. आधीचा तपास मागे घेत असल्याचे सरकारने न्यायालयात म्हणणे मांडले होते.परंतु सरकारचे हे म्हणणे याचिकाकर्ते यांना मान्य नाही. आधी तो तपास चुकीचा असल्याने रद्द करा, मगच नव्याने तपास करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.

पारनेर कारखान्यांचे अस्तित्व आजही अबाधीत असून कारखान्यांचे अवसायनातून पुनर्जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी बचाव समितीचा प्रयत्न उचित आहे. त्यांच्या मागणीला शेतकरी महासंघाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. आता कारखान्यांचा ताबा घेतांना पारनेरचे आ. नीलेश लंके सभासदांची की क्रांती शुगरची बाजू घेणार हे आता तुम्हाला पहावे लागेल. राज्यातील विक्री झालेले साखर कारखाने तेथील सभासद हळूहळू ताबा घेणार आहेत. यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याचे शेतकरी-कामगार नेते माजी आ. जाधव यांनी सांगितले.

राज्यातील पारनेर कारखाना प्रथम ताब्यात घेण्यात येईल असा ठराव देखील या बैठकीत शेतकर्‍यांनी व सभासदांनी केला. यावेळी कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबनराव कवाद यांनी पारनेरच्या विक्रीतील भ्रष्टाचाराबाबत माहिती दिली व आम्हाला पारनेर ताब्यात घेण्यासाठी राज्यातील महासंघाने मदत आमच्या मागे उभी करावी, अशी मागणी देखील जाधव यांच्याकडे केली. हा कारखाना ताब्यात घेवून उत्तम चालवुन दाखवू असा आत्मविश्वास बचाव समितीचे रामदास घावटे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाऊसाहेब खेडेकर, पांडुरंग पडवळ, रामदास कवडे, कृष्णाजी बडवे, जालींदर सालके, ओंकार सालके, संकेत शेळके, अमोल ठुबे, भाऊ पानमंद, पोपट लंके, शिवाजी क्षिरसागर, संपतराव वाळुंज, सुभाष बेलोटे, विठ्ठल कवाद, शंकर गुंड, रघुनाथ मांडगे, संभाजीराव सालके, बबनराव सालके, गोविंद बडवे, ज्ञानदेव पठारे, दत्ता भुकन, बाबाजी गाडीलकर, श्रीधर गाडीलकर, शंकर तांबे, एकनाथ गुंजाळ, भानुदास साळवे, दिगंबर घोगरे, दत्ता पवार, शिवाजी पवार, बाबुराव मुळे यांच्यासह अनेक शेतकरी-कामगार उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com