पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील कान्हूरपठार येथे चोर्यांचे सत्र सुरूच आहे. मागील महिन्यात नवलेवाडी येथील पाच लाख रुपयांची सोन्याच्या दागिन्यांची चोरी

ताजी असताना रविवारी पहाटे पारनेर रस्त्यावरील घरातून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या साडेअकरा तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. सखाराम ठुबे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, रविवारी पहाटे 2 वाजता पारनेर रस्त्यावर निवृत्त प्राचार्य सखाराम कोंडाजी ठुबे (वय 70) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी लोखंडी मुख्य दरवाजाची कडी उघडून आतील लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा हत्याराच्या सहाय्याने तोडून प्रवेश केला.

घरामधून आतील खोलीत त्यांनी जाऊन कपाटातील वस्तुंची उचकापाचक केली. त्याठिकाणी सखाराम ठुबे, त्यांची पत्नी व मुलगी व नातवंडे त्या ठिकाणीच झोपलेले होते मात्र याचा कोणताच आवाज त्यांना आला नाही. आशालता ठुबे या उठल्यानंतर त्यांनी मोबाईल लाईटचा हलका प्रकाश घरातील मुख्य हॉलमध्ये दिसला.

त्यानंतर त्यांनी घरातील लाईट सुरू केल्यानंतर त्यांना मुख्य दरावाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला व त्यानंतर बेडरूममधील कपाट कपड्यांची उचकापाचक केलेली आढळली. त्याठिकाणी असणारे 3 लाख 49 हजार 200 रुपये किमतीचे साडेअकरा तोळ्याचे सोन्याचे दागिने व 1 हजार 200 रुपये अशी चोरी झालेली आढळली.

आपला पाठलाग न होण्यासाठी घरासमोर असणार्या दुचाकीची चावी देखील चोरांनी बरोबर नेली. सर्वांना जाग आल्यानंतर परीसरातील नागरिकांना संपर्क केला मात्र चोरांचा तपास कुठे लागला नाही. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हेड कॉन्स्टेबल ए. बी. पंधरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञ यांच्यामार्फत पाहणी करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.