साखर आयुक्त, सहसंचालकांना खंडपीठाची नोटीस

पारनेर कारखान्यांवर सहा वर्षांपासून बेकायदेशीर प्रशासक राज
साखर आयुक्त, सहसंचालकांना खंडपीठाची नोटीस

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

पारनेर सहकारी साखर कारखान्यांवर सहा वर्षांपासून अवसायक म्हणून राजेंद्र निकम यांनी बेकायदेशीर ताबा ठेवल्याप्रकरणी त्यांच्यासह राज्य शासनाचे सहकार सचिव, साखर आयुक्त, साखर सहसंचालक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावले आहे.

या साखर कारखान्यावर 2005 मध्ये अवसायकाची नेमणूक करण्यात आली होती. सुरवातीला अवसायकाच्या नियुक्तीचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. त्यानंतर पुढे एक वर्षांची चार वेळा मुदतवाढ दिली जावू शकते. कायद्यानुसार जास्तीत जास्त दहा वर्षांचा हा कार्यकाळ असतो. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील मुदत वाढीच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून कोणतीही मंजुरी देण्यात आलेली नव्हती. तरीही राज्याचे तत्कालीन साखर आयुक्त यांनी निकम यांची अवसायक म्हणून 2016 ला नेमनुक केली. तेव्हापासून आजपर्यंत निकम यांनी पारनेर कारखान्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा ठेवला आहे.

याशिवाय त्यांची नियुक्ती बेकायदेशीर असताना त्यांनी 2018 मध्ये कारखान्यांची उर्वरित जमीन विक्रीला काढली होती.या विक्रीला बचाव समितीने न्यायालयातून स्थगिती घेतली. त्यानंतर 2019 ला अवसायकाने कारखान्यांची सुमारे 30 एकर जमीन क्रांती शुगरला विना मोबदला अदलाबदल करून दिली. क्रांती शुगरच्या कामगारांची काही देणी देखील दिली. तसेच अवसायक कामकाजावर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली. कारखाना विक्रीला पोषक भूमिका घेतली. अवसायकाच्या ताब्यातील कारखान्यांच्या गोडावून मधीलसुमारे 70 लाख रुपयांचे साहित्य विना मोबदला क्रांती शुगरला दिले.

कारखाना विक्रीतून राज्य सहकारी बँकेकडे असलेल्या सुमारे साडेबारा कोटी रुपयांवरही अवसायक डोळा आहे. या सर्व गैरकारभाराबाबत पुरावे जमा करून कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबनराव कवाद, साहेबराव मोरे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिक दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या समोर झाली. कारखाना बचाव समितीची बाजू अ‍ॅड. अरविंद अंबेटकर यांनी मांडली. आता 28 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com