कांद्याचे दर घसरताच शेतकऱ्यांचा कांदा साठवणूकीकडे कल !
पारनेर । तालुका प्रतिनिधी
गेल्या दिड दोन महिन्यपासुन कांद्याचे बाजारभाव कोसळले असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत असून शेतकरी कांदा साठवून ठेवण्यास प्राधान्य देत आहे.
शेतकऱ्यांना दोन पैसे खाञीने मिळवुन देणारे पिक म्हणजे कांदा पिकाकडे पाहीले जाते. मे महिना संपत आला आहे. कुठल्याही क्षणी मोसमी पुर्व व त्यानंतर मोसमी पाऊस चालू होऊ शकतो. त्यामुळे कांद्याला बाजार नसल्याने बळीराज्याच्या चिंतेत वाढ होत असुन आता शेतकऱ्यांनी कांदा साठवणूकीकडे लक्ष्य केंद्रित केले आहे.
आषाढ महिण्याशिवाय कांद्याला बाजार येवू शकत नाही, त्या हिशोबाने शेतकरी कांदा चाळ तात्पुरता निवारा पाहून कांदा साठवून ठेवत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला आजुनच काञी लागत आहे. आगोदरच कांद्याच किलोमागे खर्च दहा ते पंधरा रुपये झाला असताना आता साठवणूकीसाठी परत लाखो रुपये उभे करावे लागत आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर अजुन महिना दिड महिना कांदा साठवून ठेवण्याचे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे.
आज रोजी पारनेर बाजार समितीत कांदा आठ ते दहा रुपये किलो दराने विकला जात असुन यात शेतकऱ्यांचा खर्च ही निघत नाही. बाजारभाव नसल्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक कमालीची मंदावली आहे. आज रोजी पारनेर बाजार समितीच्या आवारात फक्त पाच ते सहा हजार कांदा गोण्या शिल्लक आहेत.