file photo
file photo
सार्वमत

कृषी अधिकार्‍यांच्या पथकाने 44 केंद्रांना दिल्या नोटिसा

चार दुकानांच्या निलंबनाचे प्रस्ताव तयार

Arvind Arkhade

पारनेर|तालुका प्रतिनिधी|Parner

तालुक्यात तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. 24) अचानक तालुक्यातील 44 कृषिसेवा केंद्राची तपासणी केली. यावेळी 17 कृषिसेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आलेल्या असून यापूर्वी या धडक मोहीमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आलेल्या चार कृषिसेवा केंद्रांवर निलंबनासाठी प्रस्ताव केले जाणार आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या आदेशान्वये दोन दिवस नेमून दिलेल्या पथकाचे प्रमुख, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी वाळिबा उघडे, कृषी अधिकारी किरण पिसाळ, वैभव थोरे, ईश्वर यादव यांच्या पथकाने पारनेर तालुक्यातील कृषिसेवा केंद्रांची तपासणी केली. त्यापैकी काही कृषिसेवा केंद्र चालकांवर कारवाई केली जाणार आहे.

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, राळेगणसिद्धी, वाडेगव्हाण, हंगा, सुपा, लोणी हवेली, टाकळी ढोकेश्वर, निघोज, राळेगण थेरपाळ, देवीभोयरे, पारनेर, जामगाव, गोरेगाव, चिंचोली, नारायण गव्हाण व पुणेवाडी येथील कृषिकेंद्रांची तपासणी करून खते, औषधे, बी-बियाण्यांची तपासणी पण या पथकांकडून करण्यात आली आहे.

या तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून तपासणी पथकाला अनेक कृषिकेंद्रांत अद्ययावत भावफलक न लावणे, रजिस्टर अपूर्ण असणे, साठा रजिस्टरमधील साठा व पॉस मशीनमधील साठा न जुळणे, रासायनिक खते बिलमध्ये सर्व मजकूर न लिहिणे, उत्पादकांचे उगम प्रमाणपत्र न जोडणे, शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या बिलावर शेतकर्‍यांची सही न घेणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत.

सध्या तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावली असून बळीराजाकडून खते औषधे बी-बियाण्यांना चांगल्या प्रकारची मागणी आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील अनेक कृषिकेंद्रांवर शेतकर्‍यांना अनेक खतांबरोबर औषधांसह इतर वस्तू घेण्याची सक्ती केली जात आहे. तर दुसरीकडे बाजार मूल्यापेक्षा खताच्या गोणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील चार कृषी केंद्राचे परवाने निलंबित होणार असून यापुढील काळात कडक कारवाई करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com