पारनेर : 'भूमिपुत्र'च्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड पाडली, दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू

पारनेर : 'भूमिपुत्र'च्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड पाडली, दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू

पारनेर | तालुका प्रतिनिधी

चालू गळीत हंगामात एक रकमी एफआरपीसह अधिकचे ३५० रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफ.आर.पी. अधिक २०० रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा, केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल ३५०० करावा अशा विविध मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारसह साखर कारखान्यांचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली दि. १७ व १८ नोव्हेंबर रोजी दोन दिवसाचे राज्यभर ऊस तोड व ऊस वाहतूक बंद आंदोलनाचा बडगा उगारला आहे. तसेच या दोन दिवसात शेतकऱ्यांनी ऊस तोड करू नये, रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे. असे आवाहन देखील संघटनेने केले आहे.

परंतू काल संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील लिंब फाट्यावर ऊस वाहतूक होत असल्याचे भूमिपुत्रच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या भूमिपुत्रच्या कार्यकर्त्यांनी ऊसाचे ट्रॅक्टर कारखान्याकडे जात असताना रोखून धरले होते. त्यामुळे आंदोलनाला वेगळेच वळण लागले होते. तसेच या आंदोलनाच्या दोन दिवसात ऊसाचे एकही टीपरू कारखान्याला जाऊ देणार नाही असा एल्गार पुकारत ऊस वाहतूक व ऊस तोड बंद पाडण्याचा इशारा भूमिपूत्रचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिला आहे.

आंदोलनाचा आजचा दूसरा दिवस असून भूमिपुत्रच्या कार्यकर्त्यांनी पठार भागातील ज्या ठिकाणी ऊस तोड चालू आहे. त्याठिकाणी थेट शेतात जाऊन ऊस तोड बंद पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. मागण्या मान्य न केल्याने भूमिपूत्र संघटना आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश सचिव किरण वाबळे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संजय भोर, मंजबापु वाडेकर, नवनाथ जाधव, संपत फटांगरे, उल्हास दरेकर, संकेत भोर, संदीप जाधव, विलास गागरे यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com