
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सिव्हील हॉस्पिटलमधील कैदी वार्डातून सबजेलमध्ये जाण्यासाठी निघालेल्या आरोपीच्या खिशात पोलिसांना मावा, सिगारेट, बिडी आणि गांजा आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांत त्या कच्च्या कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू ऊर्फ बाली मच्छिंद्र खरात असे आरोपी कैद्याचे नाव आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल शफी सलीम शेख यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
बाळू खरात हा विनयभंग आणि बालकाचे लैगिंक शोषण प्रतिबंध कायद्याखाली अटकेत आहे. अटकेतील बाळू खरात हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यासह सहा कैदी सिव्हिल हॉस्पिटलच्या कैदी वार्डात होते. कैदी वार्डातील आरोपींना सबजेलमध्ये पोहच करण्याचे तोंडी आदेश तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी शेख यांना दिले.
सहाय्यक फौजदार बाळू मंडलिक यांच्यासह शेख हे सहा आरोपींना घेऊन सबजेलकडे निघाले. काल मंगळवारी दुपारी साडेचार वाजता ते सबजेलच्या गेटवर पोहचले. सबजेलमध्ये कैदी घेण्यापूर्वी नियमानुसार मल्लिकार्जुन केगाव यांनी आरोपींची झडती घेतली. झडतीनंतर पाच कैदी सबजेलमध्ये घेतले गेले.
बाळू खरातची पोलिसासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे चिलीम, चिलीमीत ठासून भरलेला गांजा, सिगारेट, बिडी, मावा पुढ्या आढळून आल्या. सबजेल एसपींनी त्याला जमा करून न घेता त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी पत्र पोलिसांना दिले. त्यानंतर आरोपी खरात यास घेऊन पोलीस तोफखाना पोलिस ठाण्यात पोहचले.
पीआय सुनील गायकवाड यांनी पंचासमक्ष गांजा, बिडी, सिगारेट, मावाचा पंचनामा केला. वरिष्ठांच्या सुचनेनंतर बाळू खरात विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून खरातला अटक केली आहे.
पोलीस अधिकार्यांची टोलवाटोलवी
गुन्हा घडल्याचे ठिकाण हे सिव्हील हॉस्पिटल ते सबजेल चौक असे आहे. सबजेलमध्ये झडती घेतल्यानंतर मुद्देमाल मिळाल्याने कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करावा अशा सूचना ड्युटीवरील पोलिसांना मिळाल्या. त्यानुसार पोलीस कोतवालीत पोहचले. पण कोतवाली पोलिसांनी सिव्हील हॉस्पिटलचे ठिकाण सांगत गुन्हा तोफखाना पोलिसांत दाखल करण्याचे सांगितले. गुन्हा नेमका कोठे दाखल करायचा असा पेच पडलेले पोलीस आरोपी खरातला घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात पोहचले. वरिष्ठांच्या आदेशानंतर तोफखान्यात गुन्हा दाखल झाला, पण त्यापूर्वी हद्दीच्या वादावरून पोलीस अधिकार्यांची टोलावाटोलवी पहावयास मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
गांजा दिला कोणी
सिव्हील हॉस्पिटलमध्ये कैदी वार्डाला गार्ड म्हणून पोलीस असतात. तेथून पोलिसच त्यांना सबजेलमध्ये पोहचवितात. बाळू खरात याला गांजा, सिगारेट नेमके दिले कोणी आणि कोठे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिव्हील हॉस्पिटलच्या कैदी वार्डात त्याला हे पदार्थ पुरविले गेले अशी शंका असून मग तेथे गार्ड ड्युटी करणारे पोलीस होते कोठे? असा दुसरा प्रश्न उपस्थित होतो. त्याची चौकशी आता केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आरोपीच्या खिशात
गोल्ड कंपनीचे सिगारेट 5
मावा पुड्या 2 44.16 ग्रॅम
चिलीम 1
गांजा 76 मिलीग्रॅम