पंकजा मुंडे ऊसतोडणी मजुरांच्या संपाबाबत घोषणा करणार

माजी आमदार केशव आंधळे : पाथर्डी येथील विश्रामगृहावर बैठक संपन्न
पंकजा मुंडे ऊसतोडणी मजुरांच्या संपाबाबत घोषणा करणार

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

आगामी ऊस गळीत हंगामापासून ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतुकदारांच्या दरवाढीसाठी ऊसतोडणी कामगारांच्या

नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे लवकरच संपाची घोषणा करणार असून त्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून राज्यभर मुकादम व ऊसतोडणी मजुरांच्या बैठका सुरू झाल्याची माहिती लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार केशव आंधळे यांनी दिली.

पाथर्डी तालुक्यातील ऊसतोडणी कामगार प्रतिनिधी व मुकादम यांची संयुक्त बैठक पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिकाताई राजळे होत्या.

तर भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपाध्यक्ष संजय किर्तने, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, ऊसतोडणी कामगार संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष पिराजी किर्तने, सचिव अशोक खरमाटे, वामन किर्तने, सुखदेव सानप, सुरेश वनवे, सर्जेराव डोईफोडे, तुकाराम तिडके, बाबासाहेब डोईफोडे, राजरत्न जायभाये, संतराम दराडे, महादेव किर्तने, शिवाजी बांगर, बाळासाहेब बटुळे, अजिनाथ कराड, माणिक बटुळे आदी यावेळी उपस्थित होते.

माहिती देताना आंधळे म्हणाले, राज्यात ऊसतोडणी कामगार क्षेत्रात 12 संघटना व सुमारे पंधरा लाख ऊसतोडणी मजूर कार्यरत आहेत. सर्वात मोठी व प्रभावशाली संघटना म्हणून पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार व मुकादम व वाहतूकदार संघटना म्हणून ओळखली जाते.

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ऊसतोडणी कामगारांनी पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व स्विकारले आहे. त्यांनीही ऊसतोडणी मजुरांना केंद्रस्थानी मानून नेहमीच न्याय दिला आहे. ऊसतोडणी मजूर मोठ्या संख्येने पंकजाताईंबरोबर असल्याने साखर संघ व कारखानदारांचे त्यांच्या भुमिकेकडे लक्ष आहे.

साखर संघ व संघटनेदरम्यान दरवाढीच्या कराराची मुदत यावर्षी संपल्याने तोडणीसाठी प्रतिटन पाचशे रुपये व मुकादमाच्या कमिशनमध्ये दरवाढ या प्रमुख मुद्यांवर संप पुकारला जाणार आहे. 2015 मध्ये संप करून पंकजाताई मुंडे यांनी 20 टक्के वाढ मिळवून दिली होती. संप करण्याच्या पूर्वी त्या ऊसतोडणी मजूर, मुकादम यांच्याशी चर्चा करून विश्वासात घेऊनच संपाची घोषणा करतात.

त्यामुळेच ऊसतोडणी मजूर असणार्‍या तालुक्यात बैठका घेऊन अडचणी व दरवाढीबाबत चर्चा करून पंकजाताईंसमोर भूमिका मांडणार आहोत. त्यानंतर त्या जो निर्णय घेतील तो संघटनेला मान्य राहील. योग्य निर्णय घेऊन ऊसतोडणी मजुरांना न्याय देतील, असा विश्वास आंधळे यांनी व्यक्त केला.यावर्षी प्रथमच खरीप हंगाम उत्तम साधला असून सर्वत्र मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने ऊसतोडणीसाठी मजुराचा कल कमी झाला आहे.

तसेच करोनामुळे घर सोडण्याची मजुरांची इच्छा नाही अशा परिस्थितीत संघटनेकडून संपाच्या हालचाली सुरू झाल्याने आगामी ऊसगाळप हंगामावर संकटाचे ढग आतापासूनच जमू लागले आहेत.

ऊस उत्पादक व साखर कारखानदारांच्या दृष्टीने यंदाचा गाळप हंगाम सत्वपरीक्षा पाहणारा ठरणार आहे.राज्यात सर्व साखर कारखान्याकडे कमी प्रमाणात ऊसतोडणी यंत्रे सध्या कार्यान्वित असल्याने ऊस तोडायचा कसा याची चिंता आतापासूनच कारखानदाराला लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com