मंत्र्यांनी जनतेची थट्टा मांडल्याचे चित्र- पंकजा मुंडे

मंत्र्यांनी जनतेची थट्टा मांडल्याचे चित्र- पंकजा मुंडे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधि| Pathardi

युती सरकारच्या काळात उपेक्षित व वंचितासाठी विविध योजना आणून सक्षमपणे राबविल्या. सध्या शेतकर्‍यांना पीक विमा, अनुदान निधी मिळत नाहीत, मग मंत्री कार्यक्रमाला येऊन उद्घाटने कशाची करतात? सत्ताधारी मंत्रीच काम करायचे सोडून विरोधी पक्षावर आरोप करतात हे आपले दुर्दैव आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे नेते, मंत्री अटक होताना दिसतात. सरकारमधील मंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप करून जनतेची थट्टा मांडल्याचे सध्याचे चित्र आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.

शहरातील स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगींग पार्क, माधवराव निर्‍हाळी नाट्यगृह व मुख्यमंत्री सडक योजना कामांचा लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमानंतर आयोजीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिका राजळे होत्या तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,गोकुळ दौंड,धनंजय बडे, राहुल राजळे,संध्या आठरे,अमोल गर्जे,अजय रक्ताटे अ‍ॅड.प्रतिक खेडकर,काशिबाई गोल्हार,नंदकुमार शेळके रमेश गोरे,बजरंग घोडके,महेश बोरुडे,प्रवीण राजगुरू,अनिल बोरूडे,नामदेव लबडे,सुनीता बुचकुल,शारदा हंडाळ,विष्णूपंत अकोलकर,सुनील ओव्हळ,सुभाष केकाण,शिवनाथ मोरे,सचिन वायकर,बाळासाहेब पाखरे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाल्या, आम्ही न मागता विकास लोकांपुढे दिला. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संप करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. चर्चेतून मार्ग निघून प्रश्न सुटतो. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत.युवकांना ड्रग्सच्या विळख्यात अडकवून व्यसनाच्या जाळ्यात ढकलणे हा आतंकवादाचा नवा प्रकार आहे. यावेळी खा.डॉ.सुजय विखे यांनी अत्यंत आक्रमक भाषण करीत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांनी केले तर आभार बजरंग घोडके यांनी मानले.

सभेपूर्वी पंकजा मुंडे यांचे नाईक चौक ते सभास्थळापर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणुकीने आगमन झाले. शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले.टाकळी फाटा येथे अजय रक्ताटे व संजय फुंदे यांनी तर पाडळी येथे सरपंच बाजीराव गर्जे यांनी जेसीबीतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी लाडक्या,कष्टाळू व प्रामाणिक आमदार म्हणून आमदार मोनिका राजळे यांचा उल्लेख करताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. मी आमदार,मंत्री नाही तुम्हीच उद्घाटन करा मी फक्त भाषण करील असे मी मोनिकाताईनां सांगितले होते.मात्र तोच धागा पकडत आ. मोनिका राजळे म्हणाल्या ताई तुम्ही सत्तेत असो किंवा नसो आमच्यासाठी तुम्ही कायमच आमदार, मंत्री व नेत्या आहात. अशा पाथर्डीकरांच्या प्रेमाने भारावल्याचे मुंडे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com