
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
विधान परिषदेत डावलल्यानंतर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. राज्याच्या विविध भागातून निवडक मुंडे समर्थक मोहटादेवी येथे जमले होते. विधान परिषद तसेच दोन दिवस राज्याच्या राजकारणात झालेल्या राजकीय घडामोडी, उलथापालथी याबाबत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
मोहटादेवी दर्शनासाठी मुंडे पाथर्डी येथे आल्या असता प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यानंतर मुंडे यांनी भाजप कार्यकर्ते व समर्थकांशी संवाद साधला. विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर मुंडे यांच्या निवडक समर्थकांनी राज्यात उद्रेक करत भाजप मंत्र्याच्या गाड्या अडवल्या, कुणी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत भाजप पक्षनेतृत्वाविरूध्द विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विरुद्ध अप्रत्यक्षपणे भावना व्यक्त केल्या तरीही याबाबत मात्र काही प्रतिक्रिया व्यक्त न करता पंकजा मुंडे यांनी मौन बाळगले होते. पक्षनेतृत्वाने सुद्धा ठळकपणे या घटनेची नोंद घेतली नाही. मात्र मोहटा देवीचे दर्शन घेण्याचे निमित्त करत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी त्यांच्यासमवेत खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रवीण घुगे आदींबरोबर होते. माळी बाभुळगाव येथे पाथर्डी तालुका भाजपाच्यावतीने पंकजा मुंडे यांचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,ज्येष्ठ भाजपा नेते अशोक चोरमले, माजी जि.प.सदस्य राहुल राजळे, माजी सभापती सुनीता दौंड, अजय रक्ताटे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, डॉ.मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, धनंजय बडे, अमोल गर्जे, संजय बडे, रवींद्र वायकर, विष्णूपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, जे.बी.वांढेकर, नारायण पालवे, भगवान साठे, संजय किर्तने, बाळासाहेब गोल्हार, वामन किर्तने यांच्यासह पाथर्डी शेवगाव मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुंडे म्हणाल्या कोणत्याही पदावर नसताना पाथर्डीकरांनी केलेल्या भव्य स्वागतामुळे आपण भारावून गेलो आहोत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा वारसा घेऊन आपण सक्रिय आहोत. आपला संयम एवढा लेचापेचा नाही एका कारणाने (विधान परिषद) एवढी डळमळून जाईल. मात्र राज्यभरातील लोकांच्या मनात जो संताप होता तो पुसून टाकून जे बोलायचे ते स्पष्टपणे बोलून कार्यकर्त्यांची क्षमा मागावी यासाठी एकत्रित भेटलो आहोत. कार्यकर्त्यांना अडचणीत आणून मला काही मिळवायचे नाही. सत्त्व, तत्व, ममत्व ही माझी तत्वे आहेत राजकारण म्हणजे युध्दासारखे आहे जिंकण्यासाठी खेळावे लागले तरी तहाची सुद्धा तयारी ठेवावी लागते, असे त्या म्हणाल्या.
खा. डॉ. विखे झाले सारथी
पंकजा मुंडे यांच्या आजच्या पाथर्डी दौर्यात खा.डॉ.सुजय विखे यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या वाहनाचे दिवसभर सारथ्य केले. राज्यभरात मोठ्या राजकीय उलथापालथी होत असताना विखे आणि मुंडे दोघेही शांत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.