कोणतेही सामर्थ्य पाठीशी नसताना तेव्हा माझ्या वडिलांनी करून दाखवले

पंकजा मुंडेंचा फडणवीस यांना टोमणा
कोणतेही सामर्थ्य पाठीशी नसताना तेव्हा माझ्या वडिलांनी करून दाखवले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मला आठवते की एका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी सत्ताधारी पक्षाची 17 मते फोडली होती. ते ही एकट्याने. कोणतेही सामर्थ्य पाठीशी नसताना हे काम केले होते, अशा शब्दांत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष चिमटा काढला. मात्र, आता आमच्या पाठीशी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने मोठे सामर्थ्य उभे आहे. विकासाची दृष्टी देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. नक्कीच याचा परिणाम होतो आहे, असे मला वाटते, अशी पुस्ती जोडत आपल्यामागे पक्षाने दिल्लीतून ताकद उभी केली याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नगर येथे त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी विधान परिषद निवडणूक निकालावरील प्रतिक्रिया देताना फडणवीस यांचा उल्लेख टाळला.गोपीनाथ मुंडे यांनी एकट्याने केलेल्या कामगिरीचा दाखला देत आता राज्यातील भाजप नेत्यांच्यामागे दिल्लीतून पाठबळ असल्याकडे लक्ष वेधल्याने, तो चर्चेचा विषय झाला आहे. मुंडे यांनी मंगळवारी सकाळी एमआयडीसीतील स्नेहालय संस्थेस भेट देऊन तेथील मुलांसमवेत योग दिन साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपने बाजी मारली. त्यानंतर विरोधीपक्ष नेते फडणवीस यांचे सर्वत्र कौतुक सुरु असताना भाजपमधील

नाराज नेत्या पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांचे कौतुक टाळून वडील आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या एका जुन्या कामगिरीचा उल्लेख केला.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या, राज्यसभा निवडणुकीनंतर हा निकाल अपेक्षितच होता. यामध्ये विजयी झालेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांचे अभिनंदन करते. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या दोन आणि काँग्रेसच्या एका विजयी उमेदवारांचेही अभिनंदन त्यांनी केले. हा निकाल सर्वांना अपेक्षित होता, असेही त्या म्हणाल्या. संख्याबळ नसताना भाजपचा विजय झाल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, संख्या बळावर केलेले काम समाजकारण असते तर संख्या बळ नसताना केलेले राजकारण असते. संख्याबळ नसतांना इतरही अनेक निवडणुका आम्ही लढविल्या आहेत आणि जिंकल्याही आहेत. त्या जिल्हा परिषद किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो, तेथे संख्याबळ कमी असूनही आम्ही लढलो आणि जिंकलो आहोत, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, विधान परिषद निवडणूक निकालाचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, यावर बोलताना, याबाबत मी भाष्य करणे योग्य नाही. कारण त्या प्रक्रियेत मी नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com