शेतीची कामे लवकर उरका यावर्षी भरपूर पाऊस-डख

झाडे लावून पृथ्वीचे तापमान कमी करण्याचे आवाहन
शेतीची कामे लवकर उरका यावर्षी भरपूर पाऊस-डख

भोकर |वार्ताहर| Bhokar

यावर्षी भरपूर पाऊस होणार त्याबरोबर कांद्याचे भावही वाढणार आहेत. तुमच्याकडे शेतीची कामे उरकण्यासाठी केवळ आठ दिवस बाकी आहेत. कामाचा उरक करा. दि. 8 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होणार आहे, दि. 27 व 28 जूनच्या दरम्यान खरिपाची पेरणी सुरू होईल. जास्त पावसामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतात चर खोदावे लागणार आहेत तर दि. 26 ऑक्टोबरला थंडीचे आगमन होणार आहे. जेवढी उष्णता व तापमान वाढेल तितका पाऊस वाढणार आहे. जोराचा पाऊस व गारपीट टाळण्यासाठी व पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी झाडे लावा, असे आवाहन प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले.

श्रीरामपूर तालुक्यातील खोकरफाटा येथील लक्ष्मी लॉन्स येथे आयोजीत ‘समृद्ध शेतकरी सन्मान सोहळा’प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक तथा जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय तंत्र अधिकारी पांडुरंग साळवे, नेवासा येथील कृषी अधिकारी बाळासाहेब कासार, गुण नियंत्रण निरीक्षक अजीतानंद पावसे, संभाजी बिग्रेडचे शिवाजी पवार, लक्ष्मीमाता मिल्कचे बाबासाहेब चिडे आदी उपस्थित होते.

दि. 4 जून ते दि. 7 जून मान्सूनपूर्व पाऊस होऊन सर्वत्र पाणीच पाणी होणार आहे. तर दि. 8 जूनला मान्सून दाखल होणार आहे. गेल्या वर्षी पावसाने दिशा बदलल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. शक्यतो पुर्वेकडून येणारा म्हणजेच परतीच्या पावसाचा अहमदनगर जिल्ह्याला जास्त फायदा होतो. येत्या दि. 20 सप्टेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये वादळ तयार होऊन कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो पाऊस संगमनेरपर्यंत चांगला होईल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस होईल तर दि. 26 ऑक्टोबरपासून थंडी सुरू होईल.

या भागात झाडांची संख्या कमी असल्यामुळे तसेच प्रदुषणामुळे तापमानात वाढ होत असल्याने त्या प्रमाणात पावसाची वाढ होणार आहे. त्यामुळे बर्‍याचदा पिकांचे नुकसान होत आहे. ते थांबवायचे असेल तर झाडे लावावे लागणार आहेत. दरवर्षी दि.22 फेब्रुवारी ते दि.10 मार्चच्या दरम्यान गारपीट होते. वाढत्या तापमानामुळे भविष्यात जास्त प्रमाणात पाऊस होईल पण त्यामुळे शेतीचे गणित बदलत आहे. जमिनीचा निचरा करण्यासाठी आता शेतात चर काढावे लागणार आहेत. चर व नाले काढले नाही तर पिके खराब होतील. शेतकर्‍यांनी आता हवामानावर आधारीत शेती करावी, निसर्गाच्या विरोधात जावून शेती करू नये. तसेच यावर्षी कांद्याचे भावात वाढ होणार असल्याचा अंदाजही डख यांनी वर्तविला.

यावेळी आयोजकांच्यावतीने कृषी व कृषी संलग्न असलेल्या उद्योग व्यवसायात यशस्वी झालेले शेतकरी, व्यावसायीक व समुहांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व गटविककास अधिकारी प्रविण सिनारे यांनी यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी भोकर येथे सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर शिंदे व रेणुका हर्बलचे मच्छिंद्र पटारे मित्र मंडळाच्यावतीने व खोकर सोसायटी येथे अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक कोल्हे आदींनी पंजाबराव डख यांचा सत्कार केला. यावेळी अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, मोहनराव काळे, ज्ञानेश्वर उंडे, गणेशखिंड देवस्थानचे सचीव बजरंग दरंदले, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार आदींसह नेवासा व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर उंडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com