
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सुमारे सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूकीच्या काळात घडलेल्या पांगरमल (ता. नगर) विषारी दारूकांडाच्या गुन्ह्यात फरार असलेली संशयित आरोपी, जिल्हा परिषदेची माजी सदस्य भाग्यश्री गोविंद मोकाटे (रा. पांगरमल) हिला अखेर सहा वर्षानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली. तिला न्यायालयाने फरार घोषित केले होते. तिला सोमवारी न्यायालयापुढे हजर केले असता तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सहा वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी आयोजित केलेल्या मेजवानीप्रसंगी विषारी दारूचे सेवन केल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला, दोघांना अंधत्व आले तर एक अपंग झाला. या दारूकांडात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला, मात्र या नऊ जणांच्या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर इतरांच्या मृत्यूचा नंतर उलगडा झाल्याने नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. विषारी दारू येथील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या आवारात बंद पडलेल्या उपहारगृहात बनवली जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात झालेल्या गुन्ह्याचा तपासनंतर सीआयडी कडे वर्ग करण्यात आला या गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी जगजीत गंभीर, जाकीर शेख, गोविंद मोकाटे, भाग्यश्री मोकाटे, भीमराज आव्हाड, दादा वाणी, सुरजीत गंभीर, अमित मोतीयानी आदी 20 जणांचा समावेश आहे. यातील राजेंद्र बबन बुगे याचा पसार असताना अपघाती तर मोहन दुग्गल (रा. तारकपूर, नगर) याचा नाशिक कारागृहात मृत्यू झाला. काही संशयित आरोपींना उच्च न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे. त्यामध्ये भाग्यश्रीचे वडील पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे याचाही समावेश आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या भाग्यश्री मोकाटे हिला सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सोमवंशी यांनी अटक केली व सोमवारी न्यायालयापुढे हजर केले. तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. आज, बुधवार पुन्हा न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. पांगरमल दारूकांड घडल्यानंतर भाग्यश्री मोकाटे हिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी ती शिवसेनेची उमेदवार होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर झालेल्या मतदानातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ती विजयी झाली. मात्र गुन्हा घडल्यापासून ती फरार असल्याने विजयी झाल्यानंतरही प्रत्यक्षात तिला कधीच जिल्हा परिषदेच्या कामकाजात भाग घेता आला नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी वेळीही तिला मतदान करता आले नाही.
बुरखा घालून येत होती सभेला
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला सदस्यांची उपस्थिती बंधनकारक होती. सलग तीन सभेला गैरहजर राहिल्यास संबंधीत सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात येत असे. मात्र, अनेक वेळा माजी सदस्या मोकाटे फरार असतांना बुरखा घालून जिल्हा परिषदेच्या सभागृहात येवून सभेच्या हजेरीपत्रकावर येवून सह्या करून सभा सुरू होताच कोणाला संशय याच्या आधी निघून जात असे, यामुळे कोणालाच याचा थांगपत्ता लागत नसे.