
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महाराष्ट्र विधान मंडळाची पंचायत राज समिती 23 ते 25 जून दरम्यान जिल्हा दौर्यावर येणार आहे. यावेळी समितीच्या अध्यक्षांसह 32 आमदार असणारे सदस्य हे जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची झाडाझडती घेणार असून 2016-17 आणि 2017-18 च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष घेणार आहे.
दरम्यान, पंचायत समितीच्या अधिकृत दौरा आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन आतापासून कामाला लागले असून समितीच्या सदस्यांच्या राहण्यापासून ते खाण्यापर्यंतच्या नियोजनात व्यस्त होणार आहे. पंचायतराज समितीचे अध्यक्ष आ. संजय राजमुलकर असून समितीमध्ये आ. प्रदीप जैस्वाल, आ. कैलास पाटील, आ. राहूल पाटील, आ. अनिल पाटील, आ. संग्राम जगताप, आ. दिलीप बनकर, आ. शेखर निकम, आ. सुभाष धोटे, आ. माधवराव पवार, आ. प्रतिभा धानोकर, आ. हरिभाऊ बागडे, आ. डॉ. विजयकुमार गावीत, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, विजय रहांगडाले, आ. राणा पाटील, आ. प्रशांत बंब, आ. मेघना साकोरे, आ. किशोर जोरगेवार, आ. अंबादास दानवे, आ. विक्रम काळे, आ. अमरनाथ राजुरकर, आ. निरंजन डावखरे, आ. सुरेश धस हे सदस्य आहेत. तर विशेष निमंत्रितामध्ये आ. किशोर आप्पा पाटील, आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. किशोर दराडे, आ. रत्नाकर गुट्टे, आ. महादेव जानकर, आ. सदाशिव खोत यांचा समावेश आहे.
समिती 23 जूनला सकाळी 10 ते 11.30 दरम्यान नगरच्या शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांसोबत आणि जिल्हा परिषद सदस्यांसोबत अनौपचारिक चर्चा करणार आहे. त्यानंतर 2016-17 आणि 2017-18 च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील जिल्हा परिषदेच्या संबंधातील परिच्छेदासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविणार आहे. 24 जूनला जिल्ह्यातील पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतींना भेटी देणार असून पंचायत समिती गटविकास अधिकारी व संबंधीत अधिकर्यांची प्रश्नावली क्रमांक दोनच्या संदर्भात साक्ष नोंदविणार आहेत. त्यानंतर 25 जूनला जिल्हा परिषद सभागृहात 2018-19 या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष नोंदविणार आहे.
पंचायत राज समिती ही उच्च अधिकार असणारी समिती आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना जपून आपली साक्ष आणि म्हणणे सादर करावे लागणार आहे. पंचायत राज समितीच्या दौर्यांची तयारी हे एखाद्या लग्नपेक्षा कमी नसल्याने आतापासून अधिकारी आणि कर्मचार्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मागील महिन्यांत जिल्ह्यात आलेल्या अनुसूचित जाती- जमाती समितीच्या सदस्यांच्या राहण्यावरून मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आमदार आणि त्या समितीचे सदस्य यांनी राहण्यास अन्य बाबीवर मोठी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन आतापासून अलर्ट झाले आहे.