पळवे बुद्रुक, बाबुर्डीच्या शेतकर्‍यांचा भूसंपादनास विरोध

पळवे बुद्रुक, बाबुर्डीच्या शेतकर्‍यांचा भूसंपादनास विरोध

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

शेतकर्‍यांची बागायती, अन्नधान्य पिकवणार्‍या जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादीत करण्यास पारनेर तालुक्यातील पळवे बुद्रुक व बाबुर्डीतील शेतकर्‍यांचा विरोध आहे. याबाबत त्यांनी नाशिक येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

सन 2015-2016 मध्ये आमच्या जमिनीच्या 7/12 वर भूसंपादनाचे शिक्के टाकण्यात आले आहेत. त्यास आम्ही त्वरित भूसंपादन झालेल्या बागायती व अन्नधान्य पिकवणार्‍या जमिनीस ग्रामसभेद्वारे हरकत दर्शविली आहे. याशिवाय वेळोवेळी अनेक निवेदनाद्वारे भूसंपादनास सन 2018 मध्ये हरकत म्हणून आम्ही खंडपीठ औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. सन 2019 मध्ये रिट याचिकेचा निर्णय आला व त्यामध्ये हरकत असणार्‍या शेतकर्‍यांना तीन महिन्यांमध्ये विचार करण्यास सांगण्यात आले होते.

परंतु तीन महिन्यांमध्ये कुठलाही निर्णय न दिल्यामुळे सर्व शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केलेली आहे. ती उच्च न्यायालयामध्ये विचाराधीन आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत शेतकर्‍यांनी भूसंपादनास पूर्णपणे विरोध केला आहे. निवेदनावर शेतकरी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय ठुबे, शिवाजी चौधरी, खजिनदार राजेंद्र कळमकर, सुरेश भगत, बाळासाहेब पळसकर, गोरक्ष कळमकर यांच्यासह सुमारे 58 शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com