पालखी अडथळा होणारी प्रथा दूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा

राजेंद्र कोते यांची मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी
पालखी अडथळा होणारी प्रथा दूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबांच्या मंदिरात बाबांच्या हयातीपासून रुढी परंपरा सुरू असून मागील गुरुवारी पालखीदरम्यान बाबांचा कोट विश्वस्तांच्या हातात देण्यात आला आहे. तसेच पालखी सभोवताली अनेक लोक आणि विश्वस्त उभे राहत असल्याने जगातील भक्तांना पालखी पाहण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. ही अनिष्ट प्रथा सुरू झाली असून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी साईभक्त तात्या पाटील कोते यांचे पणतू राजेंद्र सुभाष कोते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजेंद्र कोते यांनी साईबाबांच्या पालखीतील या गैरप्रकाराबाबत निवेदनात म्हटले आहे की, आम्ही परंपरेप्रमाणे श्री साईंच्या पालखीमध्ये साईबाबांची प्रतिमा घेऊन पालखीत ठेवणे, बाबांना चिलिम पाजणे आदी कर्तव्य करत असतो. गुरुवार दि. 7 जुलै रोजी व आषाढ़ी एकादशी रविवार दि. 10 जुलै रोजी रात्री 9:15 पालखी निघतेवेळी बाबांचा कोट साईमंदिर प्रमुख रमेश चौधरी यांनी विश्वस्ताच्या हाती दिला व तो मिरवणुकीने द्वारकामाईपर्यंत नेण्यात आला. याबाबत मी मंदिर प्रमुखांना विचारले असता त्यांनी विश्वस्त मंडळाचा ठराव झाला आहे असे उत्तर दिले.

पालखीच्या आजूबाजूने अनेक लोक उभे राहतात. त्यामुळे थेट प्रक्षेपण पाहत असलेल्या देश विदेशातील भक्तांना अडथळा निर्माण होतो. तसेच विश्वस्त हे चावडीमध्ये सुद्धा पालखीच्या वेळेस आत येऊन गर्दी करतात. त्यामुळे अनिष्ट प्रथा निर्माण होत असतात. तरी आपण यावर योग्य ती कार्यवाही करावी आणि विश्वस्त मंडळाचा याबाबतीत कोणता ठराव झालेला आहे त्याची प्रत मिळावी तसेच याबाबत कोणती आणि काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती मिळावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com