पालिकेतून महात्मा गांधींची प्रतिमा गायब

उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांचे आंदोलन
पालिकेतून महात्मा गांधींची प्रतिमा गायब

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गांधी जयंतीच्या दिवशी राहाता नगरपालिकेतून गायब झालेला महात्मा गांधींचा फोटो

उपनगराध्यक्ष व विरोधी नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनानंतर पालिकेत दाखल झाला. महात्मा गांधी यांचा फोटो शोधण्यासाठी कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली होती.

काल 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी करण्यावरून राहाता पालिकेत मोठे नाट्य पहायला मिळाले. सकाळी पालिकेत काँग्रेसनंतर भाजप पदाधिकार्‍यांनी महात्मा गांधी व लालबहादुर शास्री यांची जयंती साजरी केली.

त्यानंतर शिवसेना उपनगराध्यक्ष व त्यांचे मित्रपक्षाचे नगरसेवक पालिकेत जयंती साजरी करण्यासाठी गेले असता पालिकेतून महात्मा गांधींची प्रतिमाच गायब झाल्याचे दिसून आले. कर्मचार्‍यांना विचारणा केली मात्र प्रतिमा कोठे गेली ते कळलेच नाही.

त्यामुळे संतप्त झालेले उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे व बाळासाहेब गिधाड यांनी पालिकेच्या दरवाजात ठिय्या देत घोषणाबाजी सुरू करत आंदोलन सुरू केल्याने कर्मचारी व अधिकारी यांची फोटो शोधण्यासाठी एकच धावपळ उडाली.

या दरम्यान पालीकेतील महात्मा गांधींचा फोटो शिवाजी चौकातील काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात आढळून आला. कर्मचार्‍यांनी तो फोटो ताब्यात घेऊन पुन्हा पालिकेत नेऊन ठेवला. त्यानंतर उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी गांधी प्रतिमेचे व लालबहादुर शास्री यांच्या प्रतिमांचे पूजन केले. यादरम्यान सुरू असलेल्या नाट्यामुळे बराच वेळ सुरू असलेल्या पालिकेतील प्रतिमा नाट्यावर पडदा पडला.

स्विकृत नगरसेवक पिपाडा यांचा खुलासा

महात्मा गांधींची जयंती सकाळीच पालिकेच्यावतीने साजरी केली. त्यानंतर दुपारी काही मंडळींना जयंतीची आठवण आली. त्यावेळी शहरात काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असल्याने त्यांनी त्यासाठी प्रतिमा नेली होती. प्रतिमा कोठेही गायब झाली नव्हती. मात्र काहीतरी स्टंट करण्यासाठी हा प्रकार करत असल्याचे स्विकृत नगरसेवक राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com