पाळणा चालकांकडून नागरिकांची लूट

कारवाई करण्याची भनगडे यांची मागणी
पाळणा चालकांकडून नागरिकांची लूट

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपरिषद प्रशाससाने ठरवून दिलेले दर डावलून पाळणा चालकांनडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा चिटणीस अनिल भनगडे यांनी केला असून लूट करणार्‍या पाळणा चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात भनगडे यांनी म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालिकेचा ठेका देताना ठेकेदारास सर्व पाळण्यांचे प्रत्येकी 20 रूपये दर ठरवून दिले होते. मात्र करोनामुळे दोन वर्षे यात्रेस मुकलेल्या नागरिकांनी यावर्षी रामनवमी यात्रेस पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केली. आलेली गर्दी पाहून पाळणे चालकांनी आपले दर वाढवून आवाच्या सव्वा रक्कम नागरिकांकडून उकळण्यास सुरूवात केली. काल रविवारी पहिल्याच रात्री गर्दी इतकी वाढली की, पाळण्याबाहेर अनेकांनी जास्त तिकिटे विकत घेऊन ब्लॅक देखील केले.

पालिकेने ठराविक दर ठरवून दिलेले असताना पाळणा चालकांनी पैसे उकळण्याचा धंदा सुरू केल्याने ग्रामीण भागातून येणार्‍या गोरगरीब रामभक्तांची लूट होत आहे. पालिका प्रशासनाच्या अनेक अधिकार्‍यांना याबाबत माहिती असली तरी संबंध बिघडू नयेत म्हणून ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पालिका प्रशासन हे नागरिकांच्या सोयीसाठी आहे की, गैरसोयीसाठी आहे. असा प्रश्न यानिमित्ताने उपसथित होत आहे.

याची चौकशी करून पाळणा चालकांना तात्काळ सुचना द्याव्यात. पाळण्याचे दर पालिकेने ठरवून दिल्याप्रमाणे आकारले जात नसतील तर संबंधित पाळणा चालकांवर कारवाई करून ठेकेदारास समज द्यावी, अन्यथा ठेकेदारास काळ्या यादीत सामाविष्ट करावे, अशी मागणी भनगडे यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास श्रीरामपूर भाजपाच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भनगडे यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com