देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

उसाचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले आहेत. तरी देखील उसाची पहिली उचल देण्यासंदर्भात साखर कारखान्यांनी कोंडी फोडली नाही.

फक्त इतर कारखान्यांच्या तुलनेत भाव देऊ व भावाबाबत कुठेही मागे राहणार नाही, अशा पोकळ घोषणा सुरू केल्या. प्रत्यक्षात मात्र, हे घोंगडं अजूनही भिजतचं पडलं आहे. सरकारने इथेनॉलला परवानगी देऊनही पहिले पेमेंट एफआरपीप्रमाणे म्हणजे किमान 2850 रुपये प्रतिटन देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी 2100 ते 2500 रुपयांप्रमाणे हे पेमेंट केल्याने शेतकर्यांमध्ये असंतोष वाढला आहे.

या वर्षाच्या प्रारंभापासून शेतकर्यांच्या पाठीमागे लागलेले ग्रहण वर्षाअखरेपर्यंतही सुटले नाही. त्यामुळे हे वर्ष शेतकर्यांना निराशेचे गेले. त्यामुळेच आता अवघ्या सहा दिवसानंतर आलेले नवीन वर्ष शेतकर्यांसाठी अच्छे दिन घेऊन यावे, अशी अपेक्षा आता शेतकरी करीत आहेत.

यंदा भरपूर पाऊस झाला असला तरी त्याचा उसावर विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. मध्यंतरी पडलेल्या तांबेरा रोगाने उसाची वाढ खुंटली व त्याचा परिणाम उसाच्या टनेजवर झाला. उसाचे वजन या रोगाने कमालीचे घटले आहे. सुरू खोडवा एकरी 35 ते 40 टनावर आला आहे. त्यामुळे आता वर्ष संपले मात्र, शेतकर्यांच्या वेदना अद्याप संपलेल्या नसल्याचे दिसून येते.

सन 2020 सालास गुडबाय करण्यासाठी अवघे सहा दिवस उरले आहेत. हे वर्ष शेतकरी, व्यापारी, सरकार, नोकरदार सर्वांच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील राहिले. करोना महामारी, अतिवृष्टी, भारत-चीन सिमा तणाव आदी महत्त्वाच्या मुद्यांवर हे वर्ष गाजले. करोनासारखी महामारी आली.

तिचा फैलाव खेड्यापाड्यांपर्यंत झाला. ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने 22 मार्चपासून प्रदीर्घ काळासाठी लॉकडाऊन टाकला. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आली. या सर्वाचा परिणाम शेती व्यवसायावर देखील मोठ्या प्रमाणात झाला. शेतीला जोडधंदा व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळख असलेला दूध धंदा मोठ्या अडचणीत आला.

34 ते 35 रुपये लिटर असणारे दुधाचे भाव 18 ते 20 रुपयांवर आले. भाजीमार्केट बंद असल्याने भाजीपाला जनावरांना घालण्याची वेळ आली. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला. हे थोडके म्हणून की काय, जून महिन्यापासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. हातातोंडाशी आलेला शेतकर्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला.

सर्व पिकांची नासाडी झाली. अनेक पिके पाण्याखाली गेल्याने जागेवर सडली. यातूनही सावरलेला शेतकरी पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे नव्यादमाने उभा राहिला व रब्बी हंगामाची तयारी करून शेतीला लागला. पण शेतकर्यांचे कैवारी म्हणून घोषणा करणार्या सरकारला मात्र त्याची दया आली नाही. दोन लाखांच्यावर कर्ज असणार्या शेतकर्यांना अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. अतिवृष्टीचा एक छदामही मिळाला नाही. विमा कंपनीने तर हातच वर केल्याने विमा एक दिवास्वप्नच राहिले.

एकदंरित हे वर्ष शेती व शेतकर्यांच्यादृष्टीने तर अत्यंत खडतरपणे गेले. येणारे पुढील वर्ष 2021 सुख, समृध्दी व आरोग्यदायी येवो हीच सर्वांची अपेक्षा आहे.