पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची बीजराखीच्या रुपाने भावाला अनोखी भेट

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची बीजराखीच्या रुपाने भावाला अनोखी भेट

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बीजराखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे.

भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनविल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आजपर्यंत बीजबँकेच्या रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकर्‍यांना आपल्या विशेष प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतले आहे. चंद्रकांत पाटील राहीबाई यांना आपल्या भगिनी मानतात व राहीबाईसुद्धा त्यांना तेवढेच आदराचे स्थान देतात, हे सर्वश्रृत आहे.

आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीजराख्यांची विशेष मोहीम राबविली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणार्‍या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनविल्याचे सांगितले.

बीजराख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत? हे दाखवून दिले आहे. राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com