न्यायालयातून विकासकामांना अडविण्याचे फलित काय

पद्मकांत कुदळे : शहरवासीयांनो आत्मचिंतन करण्याची हीच वेळ
न्यायालयातून विकासकामांना अडविण्याचे फलित काय

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राजकारणात आरोप प्रत्यारोप चालूच असतात. एकमेकांवर कितीही आरोप प्रत्यारोप करा मात्र विकास थांबता कामा नये. परंतु कोपरगाव शहरातील राजकारणाने आरोप प्रत्यारोपाच्या पुढे जाऊन चक्क न्यायालयात पाऊल ठेवले आहे. कोपरगावच्या राजकारणातील ही बहुधा पहिलीच घटना असावी. या घटनेतून शहरवासियांच्या पदरात काय पडणार आणि न्यायालयातून विकासकामांना अडविण्याचे फलित काय मिळणार यासाठी थोडा उशीर जरी लागणार असला तरी याचे फलित काय मिळणार असा प्रश्न शहरातील सर्वसामान्य नागरिकांना पडला असून यापुढील काळात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरवासीयांना आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी म्हटले आहे.

कुदळे म्हणाले, मागील दीड वर्षांपासून संपूर्ण विश्व करोनाच्या सावटाखाली जगत आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचे किती हाल झाले हे सांगायला नको. काही वर्षापासून कोपरगावच्या बाजार पेठेला ग्रहण लागले आहे. हे ग्रहण आहे मुबलकपणे मिळत नसलेल्या पिण्याच्या पाण्याचे आणि खराब रस्त्यांचे. त्यामुळे ग्रामीण भागातून कोपरगावच्या बाजारपेठेत येणारा ग्राहकवर्ग मंदावला आहे. त्याचा मोठा परिणाम व्यवसायावर झालेला दिसून येत आहे. आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाचे मनावर घेतल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. प्रश्न राहिला रस्त्यांचा तर तो प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून मार्गी लागणार होता मात्र राजकारणात या रस्त्यांचा बळी जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शहरातील रस्त्यांचा निधी दुसरीकडे वळविला गेला असताना आ.आशुतोष काळे यांनी शहरातील रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेच्या गलिच्छ राजकारणापायी खर्च होत नाही ही शहरवासीयांच्यादृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

राजकारण किती आणि कुठपर्यंत करायचे हे पालिकेतील सत्ताधार्‍यांनी लक्षात घ्यायला हवे. ज्या रस्त्यांना जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली असता त्या रस्त्यांना न्यायालयात जाऊन अडविणे हे कोणत्याही सूज्ञ नागरिकाला निश्चितपणे रुचणारे नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण योग्य आहे मात्र या राजकारणात विकास भरडला जाणे योग्य नाही त्यामुळे न्यायालयातून कोपरगाव शहरातील विकासकामांना अडविण्यामुळे शहरवासियांच्या पदरात काय पडले या प्रश्नाचे उत्तर निराशा आहे. आकसापोटी कोपरगाव शहर विकासापासून नेहमीच वंचित राहणार हे न्यायालयातून कोपरगाव शहरातील विकासकामांना अडविण्याचे फलित आहे.

तालुक्याचे भाग्य आहे, त्यांना काळे-कोल्हे सारखे सर्व सामान्यांचा विचार करणारे दिग्गज नेते लाभले आहेत. या नेत्यांकडून जनतेला विकासाची प्रामाणिक अपेक्षा आहे. मात्र राजकीय आकसापोटी जी विकासकामे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून थांबवली जात आहे हे कोपरगाव शहराच्या विकासासाठी घातक आहे. त्यामुळे यापुढे कोपरगावच्या विकासाचा विचार करणारे लोकप्रतिनिधी नगरपालिकेत पाठविणे काळाची गरज असून ज्यांच्याकडे विकासाचे व्हिजन नाही, विकास करण्याची मानसिकता नाही असे निष्क्रिय लोकप्रतिनिधी पालिकेत पाठवून उपयोग नसून असे नतद्रष्टे पालिकेपासून चार हात दूर ठेवणे शहर विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे.

कोपरगाव तालुक्यात राज्यातील दोन समृद्ध सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांच्या जोडीला उपपदार्थ निर्मिती प्रकल्प, दूध संघ व अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. त्यामुळे मोठा नोकरदार वर्ग असून अर्थकारणाची वार्षिक उलाढाल मोठी असली तरी या अर्थकारणाचा फायदा कोपरगावच्या बाजारपेठेला होत नाही. तालुक्यातील ग्राहक शहरातील असुविधांमुळे सरळ शेजारच्या शहराची वाट धरतो याचा बोध न्यायालयात जाणार्‍या राजकारण्यांनी घेतल्यास नक्कीच परिस्थिती बदल्याशिवाय राहणार नाही मात्र त्यासाठी विकासाच्या आड येणार्‍या कुटील राजकारणाला तिलांजली देणे गरजेचे आहे.

- पद्माकांत कुदळे, माजी नगराध्यक्ष.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com