पाचुंदा येथील तरुणाचा वडिलांच्या मारहाणीमुळेच मृत्यू
सार्वमत

पाचुंदा येथील तरुणाचा वडिलांच्या मारहाणीमुळेच मृत्यू

पत्नीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल; सासूने रडताना मारहाणीबाबत सांगितल्याचा फिर्यादीत उल्लेख

Arvind Arkhade

नेवासा|तालुका वार्ताहर|Newasa

तालुक्यातील पाचुंदा येथील अपघातात जखमी झाल्याचा दावा केला जात असलेल्या तरुणाचा मृत्यू हा त्याच्या वडिलांनी शेतजमिनीच्या वाटपावरून वाद झाल्याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने झाला असल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने दिली असून त्यावरून त्याच्या वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मृताची पत्नी रोहिणी रामदास खरात (वय 28) धंदा-शेती/मजुरी रा. पाचुंदा ता. नेवासा हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, मी माझे पती रामदास (वय 32), एक मुलगा व एक मुलगी असे एकत्र राहावयास होतो. माझे सासू-सासरे हे निंबेनांदूरकडे जाणार्‍या रोडलगतच्या मळ्यात राहावयास असून त्यांच्या सोबत माझी नणंद मीनाबाई शशिकांत एडके ही पण राहावयास आहे.

माझे पती रामदास यांना एक मोठा भाऊ असून त्याचे नाव रोहिदास असून ते सध्या जम्मू-काश्मीर येथे लष्करामध्ये असून ते सुट्टीवर आलेले आहेत. ते अहमदनगर येथे राहण्यास असून अधूनमधून गावी पाचुंदा येथे येत असतात. आमची सामाईक शेती असून सासरे जास्त शेती करतात व त्यात येणारे उत्पन्नही भाया रोहिदास यास जास्त देतात. माझे पती रामदास हे सासरे लक्ष्मण यांना मला शेती कमी असून आम्हा दोघा भावांना समान शेती द्या असे म्हणत. त्यावरुन त्या देघांमध्ये वाद होत. माझे सासरे माझ्या पतीला नेहमी जीवे ठार मारण्याची धमकी देत असत.

गेल्या 6 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मी पती, व दोन मुले असे घरी असताना माझे पती मला म्हणाले की, काही वेळापूर्वी माझे व वडिलांचे शेती वाटपाच्या कारणावरुन वाद झाले आहेत. त्यांनी मला आता परत बोलावले आहे. ते म्हणाले की, आपण बसून शेतीचा वाद मिटवून घेऊ. आमचे जेवण झाल्यावर माझे पती रामदास हे सासरे लक्ष्मण यांच्या मळ्यात गेले.

ते बराच वेळ झाला तरी घरी आले नाहीत. आम्ही बराच वेळ वाट पाहून झोपी गेलो. सकाळ झाली तरी न आल्यामुळे 7 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास माझे पती रामदास यांच्या मोबाईल फोनवर फोन केला असता तो फोन माझे सासरे लक्ष्मण यांनी उचलला व सांगितले की रामदास याचा रात्री अपघात झाला आहे. त्याला अपघातामध्ये मार लागला असून उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

माझे पती यांच्या मोबाईलवर सासरे बोलले व तब्यत बरी असल्याचे सांगत सायंकाळी सासर्‍याने पती रामदास यास पुढील उपचाराकरीता पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये आणले असून तेथे उपचार चालू असल्याचे सांगितले.

माझे पती रामदास ससून हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना 11 जुलै रोजी सकाळी 6 च्या सुमारास मरण पावले. 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजता माझे पती रामदास यांचे प्रेत गावी आणले.

रडताना माझी सासू सीताबाई ही मोठमोठ्याने म्हणत होती की, “माझ्या नवर्‍यानेच माझ्या मुलाचा घात केला आहे. माझ्या काळजाचा तुकडा हिरावला आहे.” अंत्यविधी झाल्यावर मी माझ्या सासूला काय झाले आहे? याबाबत विचारपूस करता त्यांनी सांगितले की, 6 जुलै रोजी रात्री 8 वाजता रामदास घरी आला व शेतीच्या वाटप करण्यावरुन दोघा बापलेकांचे भांडणे झाली होती. भांडणे चालू असताना सासरे लक्ष्मण यांनी लाकडी दांड्याने डोक्यात पाठीवर पायावर मारहाण केली होती. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागून रक्त आले होते.

मारहाण झाल्यावर मुलगा रामदास हा तेथेच झोपला. सकाळी तो उठत नसल्यामुळे त्यास उपचाराकरिता घेऊन गेले होते. माझे पती रामदास यांना लाकडी दांड्याने मारहाण केल्याने गंभीर दुखापत झाल्याने मरण पावले आहेत म्हणून माझे सासरे लक्ष्मण धोंडिबा खरात यांच्यावर कायदेशीर फिर्याद आहे.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 403/2020 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत दाते करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com