पाचपुते, नागवडे, जगतापांसाठी सोयीचे गट

सातपैकी चार जिल्हा परिषद गट झाले आरक्षित
पाचपुते, नागवडे, जगतापांसाठी सोयीचे गट

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत गुरूवारी पार पडली. यात सातपैकी चार जिल्हा परिषद गटापैकी दोन गटात अनुसूचित जाती महिला आणि दोन गट अनुसूचित जातीसाठीचे आरक्षण निघाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांसह इच्छुकांचे स्वप्न भंग होताना या चार आरक्षित गटात नव्याने इच्छुकांना संधी मिळणार आहे. मात्र, असे उर्वरीत तीन जिल्हा परिषद गट मात्र पाचपुते, नागवडे, जगताप या तिन्ही नेत्यांना सोयीचा आणि हक्काचा विजय मिळवून देणारा दिसत असतांना पंचायत समितीच्या गणात देखील कहीं खुशी कही गम असे चित्र आहे.

जिल्हा परिषद आरक्षण सोडत निघाल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील नेत्याच्या इच्छुक कार्यकर्त्यांच्या फुग्यातील हवा निघाली. चार जिल्हा परिषद गटात आरक्षण पडल्याने विद्यमान आणि भावी जिल्हा परिषद तयारी करणार्‍या अनेकांचा भ्रमनिरास होताना, या चार गटात नव्याने अनुसूचित जाती मधील कार्यकर्ते चेहरे सर्वच पक्षांना शोधावे लागणार आहेत. पिंपळगाव पिसा जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिलासाठी असल्याने अगोदरपासून तयारी करणार्‍या डॉ. प्रणोती जगताप याच्या सोयीचा गट होताना माजी आमदार राहुल जगताप यांचा प्रभाव असणारा हा गट जगताप यांच्या सोयीचा झाला.

लिंपणगाव गटात नागवडे यांचे वर्चस्व असणारे गावे असल्याने हा गट सर्वसाधारण झाला असल्याने इथे नागवडे यांना सोयीचे झाले आहे. काष्टी गट सर्वसाधारण असल्याने इथे आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची हक्काची गावे या गटात असल्याने त्यांच्या सोयीचा गट बनला आहे. काष्टी गट पाचपुतेसाठी, लिंपणगाव नागवडेसाठी आणि पिंपळगाव पिसा जगताप यांच्यासाठी सोयीस्कर गट आरक्षण काढण्यात आले. मात्र, उर्वरित चार गटात आजी, माजी सदस्यांसह इच्छुक सर्वसाधारण कार्यकर्त्यांना अडचण झाली असताना कोळगाव गटात अनुसूचित जाती महिला वर्गाचे आरक्षण निघाले, मांडवगण हा परंपरागत बालेकिल्ला असणारे आ. अरुण जगताप यांचे चिरंजीव सचिन जगताप यांना मात्र नव्याने निघालेल्या आरक्षणाचा फटका बसला.

मांडवगण गट अनुसूचित जाती महिला वर्गासाठी राखीव बनला. आढळगाव जिल्हा परिषदेत देखील अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांचा पत्ता कट झाला. बेलवंडीमध्ये देखील गटाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघाले आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार याना धक्का बसला असणार. त्यांच्या सोयीचा गट आता आरक्षित झाला. लिंपणगाव सर्वसाधारणसाठी असल्याने इथे नागवडे म्हणतील तो शब्द अंतिम असणार आहे.

काष्टी गट सर्वसाधारण झाल्याने इथे ही पाचपुते यांच्या सोयीचा गट झाला. पंचायत समितीच्या गणाच्या आरक्षणमध्ये देवदैठण:सर्वसाधारण, पिंपळगाव पिसा ओबीसी माहिलेसाठी राखीव, कोळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, घारगाव सर्वसाधारण माहिला, मांडवगण सर्वसाधारण, भानगाव अनुसूचित जाती माहिला, आढळगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग माहिला, पेडगाव अनुसूचित जाती राखीव, येळपणे सर्वसाधारण माहिला, बेलवंडी सर्वसाधारण माहिला, हंगेवाडी सर्वसाधारण, लिंपणगाव सर्वसाधारण, काष्टी सर्वसाधारण, अजनुजमध्ये अनुसूचित जमाती माहिलासाठी राखीव गण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com