पाचेगावातील 53 टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित
सार्वमत

पाचेगावातील 53 टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित

शेतमजूर पालकांची संख्या अधिक; वाड्यावस्त्यांवर सिंगल फेज नसल्याने टीव्हीवरील शैक्षणिक कार्यक्रमही पाहता येत नाहीत

Arvind Arkhade

पाचेगाव|वार्ताहर|Pachegav

राज्यसरकारने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण भागातील शाळा व शिक्षण विभाग आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून शिक्षण देत आहोत असा दावा करीत असले तरी हा दावा पूर्णपणे पोकळ आहे.

सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या अडथळ्यांमुळे ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण हे केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. पाचेगावचा विचार केला तर पाचेगावातील केवळ 47 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचले असून 53 टक्के विद्यार्थी अद्याप वंचित आहेत.

नेवासा तालुक्यातील पाचेगावचा विचार केला तर तालुक्यात मोठे गाव असून येथे प्राथमिक शाळेत 269 तर माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातून 618 असे एकूण 887 विद्यार्थी सरकारी अनुदानीत मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. त्याशिवाय इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांत शिक्षण घेणार्‍यांची संख्या दोनशेच्या आसपास असेल. अशाप्रकारे पाचेगावातील पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे 1100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

येथील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती विचारात घेतली तर बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालक हे शेतकरी अथवा शेतमजूर आहेत. आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने बहुसंख्य पालकांकडे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल नाही. त्यामुळे किमान निम्मे विद्यार्थी ऑनलाईनपासून वंचित आहेत.

झूम मीटीग,गुगल मीट याप्रमाणे अनेक उपपयोजना राबवत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी आजही या गावात, वाडीवस्त्यावर, स्मार्टफोन, अँण्ड्रॉइड, टीव्ही एवढेच नव्हे तर मोबाईलला रेंजदेखील उपलब्ध नाही. काही भागात तर अजून सिगल फेज उपलब्ध नसल्याकारणाने टीव्हीवरील अभ्यासक्रम देखील मुलांना पाहता येत नाही.

त्यातच कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणा साठी साहित्य घेणे परवडत नाही.त्यातच गावातील महाविद्यालयात 618 विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी ऑनलाइन साठी केवळ 300विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून तसा दावा केला जात असला व तो खरा मानला तरी 47 टक्के विद्यार्थीच ऑनलाईन शिक्षण घेतात. उर्वरित 53 टक्क्यांचे काय?

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची पटसंख्या 269 आहे. त्यातील काही 126 विद्यार्थी व्हाट्सअ‍ॅपच्या द्वारे शिक्षण घेत आहेत. तर उर्वरित टिव्ही च्या माध्यमातून 89विद्यार्थी शिक्षण घेत असून व यापैकी कशाचीच सोय नसलेले 54 विद्यार्थी पाठयपुस्तकांद्वारे शिक्षण घेत असल्याचा दावा शिक्षक करत आहेत.

पण खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांना यामाध्यमातून मार्गदर्शन होते का? हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण टीव्ही बघण्यासाठी ग्रामीण भागात आज देखील पावसामुळे लोडडींग आहे. मग विद्यार्थ्यांनी काय करावे हा प्रश्न निर्माण होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक आजही ऑनलाईनमुळे गोधळलेली आहे. विद्यार्थ्यांनाचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने अभ्यासक्रमात 25 टक्के कपात केल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

आमच्या माध्यमिक विद्यालयात एकूण 618 विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी आम्ही ऑनलाईनसाठी सर्व तुकड्याचे 12 ग्रुप केले आहे. 618 विद्यार्थ्यांपैकीं 300 विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेत आहे. उर्वरित विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. तर ऑनलाइन विद्यार्थीच्या पालकांनाकडे मोबाईल असल्याने काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल पूर्ण वेळ मिळत नाही. काहींना रेंज नाही. तर काहींना नेटपॅक नाही..अशा बर्‍याच अडीअडचणी ग्रामीण भागातून सतावत आहेत.

- बाळासाहेब जाधव, प्रभारी मुख्याध्यापक पाचेगाव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय

माझ्या कुटुंबात चार सदस्य असून आम्ही दोघे नवरा- बायको लोकांच्या शेतात मोलमजुरी करून आमचा उदरनिर्वाह करतो. त्यामुळे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाइल फोन द्वारे आमच्या मुलांना शिक्षण मिळू शकत नाही. आज मुलांना स्मार्टफोन, टीव्ही वर सरकार शिक्षण देण्यासाठी पर्यंतशील असले तरी गरमी भागातील माझ्या सारख्याचे मूल खरंच या शिक्षणा पासून वचीत राहणार आहे. टिव्हीला आजही ग्रामीण भागात वाड्यावस्त्यावर सिगल फिज उपलब्ध नाही. मोबाईल घेण्यासाठी पैसे नाही, मोबाइल घेतला तर महागडा नेटपॅक मारू शकत नाही.

- गजानन घोगरे, पाचेगाव

Deshdoot
www.deshdoot.com