पाचेगाव परिसरात पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने शेतकर्‍यांना कोवळी पिके वाचवण्याची चिंता

पाचेगाव परिसरात पेरणीनंतर पाऊस गायब झाल्याने शेतकर्‍यांना कोवळी पिके वाचवण्याची चिंता

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरात जवळपास सर्व शेतकर्‍यांच्या खरिपातील पेरण्या झाल्या आहेत.पण आता पावसाचा या भागात मोठा खंड पडला असून लागवडी झालेल्या कपाशी व पेरणी केलेल्या सोयाबीन आता पाण्यावर आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून आता तुषार सिंचनाचा वापर करून शेतकरी पीक उगवून वर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पाचेगाव परिसरात या पावसाळ्यात आतापर्यंत जवळपास 123 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. याच पावसाच्या भरवश्यावर शेतकर्‍यांनी पेरण्या करून घेतल्या, पण आता पावसात खंड पडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीन व कपाशीची पिके पाण्यावर आली आहेत. पिकांची पाण्याची भूक वाढली असून शेतकर्‍यांना आपली पिके वाचविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत आहे.

पाचेगाव परिसरात सोयाबीन व कपाशी पिकांची लागवड होऊन परिसरातील क्षेत्र व्यापून गेले आहे.सुरुवातीला म्हणजे जूनच्या शेवटच्या टप्प्यात पाचेगाव परिसरात पेरणी योग्य पाऊस पडला, त्यामुळे शेतकर्‍यांनी याच ओलीवर आपल्या पेरण्या करून घेण्याची घाई केली, मात्र आता तर पाऊस या भागात पडायला तयार नाही.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जवळपास सर्व क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आणि पाऊस लांबल्याने सर्वच पिके पाण्यावर आली. कोणत्या पिकांना पाणी द्यावे हाही शेतकर्‍यांना पडलेला प्रश्न आहे.

एकतर महागाईने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे. सोयाबीन बियाणे, कपाशी, मका, रासायनिक खते, तणनाशक औषधे, किटकनाशके औषधे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या सर्व अडचणींवर मात करीत शेतकर्‍यांनी खरिपातील पिकांची पेरणी व लागवडी केल्या, पण आता पाऊस उघडल्याने शेतकर्‍यांनी पेरणी केलेली कोवळी पिके आता पाण्यावर आली आहेत, त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

जर पाऊस उशीरा आला तर मात्र पिके पाण्यावाचून जाण्याची धास्ती या भागातील शेतकर्‍यांनी घेतली आहे. तसेच पाऊस वेळेवर पडला नाही तरी दुबार पेरणीच्या संकटाला देखील शेतकर्‍यांना सामोरे जावे लागेल असे दिसून येत आहे, त्यामुळे पाऊस पडून खरिपातील पिकांना जीवदान मिळावे याकरिता शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहेत. पाऊस वेळेवर पडू दे हीच या भागातील शेतकरी पांडुरंगाला विनवणी करताना दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com